
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणावरून रुग्णालय प्रशासनासह मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. "वेळीच उपचार मिळाले असते, तर त्या मायभगिनीचा जीव वाचू शकला असता," असे म्हणत वडेट्टीवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक धक्कादायक उदाहरणं समोर ठेवली.
"मी या रुग्णालयाबाबत आणि मंगेशकर कुटुंबाबाबत वक्तव्य केल्यानंतर माझ्यावर टीका झाली, मात्र मला त्याची चिंता नाही," असं सांगत त्यांनी आपले आरोप पुढे चालू ठेवले.
प्रकाश आमटे प्रकरण
"प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक होते. त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकाश आमटेंकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही, असे सांगण्यात आले. नंतर उपचार सुरू झाले. मात्र, बाहेरून औषधी मागवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये मागितले. महाराष्ट्र भूषण थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही", असे वडेट्टीवारांनी दावा करत आरोप केले.
लता मंगेशकर यांचं विदर्भ साहित्य संघ कार्यक्रम
वडेट्टीवार म्हणाले, "विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून संपर्क साधला. तेव्हा तिथून निरोप आला. पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी २२ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. चेकने देण्याची तयारी दर्शवल्यानंतर दीनानाथ मंगेशकर यांनी पैसे चेकने नाही, तर कॅशने द्या असे म्हटले. विदर्भ साहित्य संघाने, आम्ही संस्था असल्याने कॅशने पैसे देणं शक्य नाही, असे सांगितले. नंतर लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहेत तसेच करा, असे सांगितले. त्यानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला".
खासदाराच्या निमंत्रणावर पैशांची मागणी
"एका खासदाराने साहित्य संमेलनात गाणं सादर करण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिलं होतं. नंतर संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले गेले. त्या खासदाराने ते पैसे दिले. कार्यक्रम जवळ आल्यावर आणखी त्यांनी आणखी तीन लाख रुपयांची मागणी केली. पैशांच्या मागणीवर त्या अडून राहिल्या", असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
नेहरूंसमोरचं गाणंही मोफत नव्हतं
"नेहरूंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायन केलं. पंरतू त्या कार्यक्रमात गाणं गाण्यासाठी निमंत्रण आशा भोसले यांना दिलं होतं. तरीही लता मंगेशकर यांनी गायन केलं आणि मानधनही घेतलं. नेहरूंसमोरचा कार्यक्रमही मोफत नव्हता", असं वडेट्टीवार म्हणालेत.
मंगेशकर कुटुंबाबत गंभीर प्रश्न
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातवा मजला मंगेशकर कुटुंबासाठी राखीव ठेवला आहे. हे धर्मादाय रुग्णालय असूनही तपासणीसाठी २० रुपयांऐवजी ६०० रुपये घेतले जातात. ही लूट नाही का? असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
पीएकडून दहा लाख
हे रुग्णालय आमदाराच्या पीएकडून दहा लाख रुपये मागत असेल तर, हे धर्मादाय रुग्णालय गरिबांसाठी कशी म्हणावी?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारने कठोर कारावाई करावी
उपचार न देऊन एखाद्याता जीव जाणं अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारने त्यामागे कोणतीही मोठी व्यक्ती असो, कठोर कारवाई केली पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.