

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वतः जाण्यास इच्छुक होते. तर पुतणे समीर भुजभळ यांना मंत्रिपद द्यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती... मात्र, ऐनवेळी भुजबळांना डावलून राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची अचानक घोषणा करण्यात आली. त्यामुळे भाजपनं भुजबळांच्या उमेदवारीला नकार दिल्याची चर्चा रंगलीय..भुजबळांनी मात्र असा प्रस्ताव नसल्याचा दावा केलाय. मात्र इतर नेत्यांप्रमाणे आपल्यालाही न्याय हवा अशी खदखद जाहीरपणे व्यक्त केली.
भुजबळांच्या नाराजीचे मूळ हे महायुतीमधील इतर नेत्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या राजकीय संधींमध्ये दडलेलं आहे. भुजबळांनी थेट नाव घेत इतर नेत्यांच्या घराणेशाहीवर बोट ठेवलं. भुजबळांना नेमक्या कोणत्या नेत्यांसारखा न्याय हवा ते पाहूयात...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे लोकसभेचे खासदार आहेत... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा मुलगा पार्थ पवार हेदेखील राज्यसभा खासदार आहेत... त्याव्यतिरिक्त खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे मंत्री तथा आमदार आहेत.. तर मुलगा अनिकेत तटकरे विधानपरिषद आमदार आहे...त्यामुळे मला वेगळा न्याय कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय..
एकीकडे महायुतीत भुजबळांच्या नाराजीमुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र भुजबळांच्या सुरात सूर मिसळत महायुतीवर निशाणा साधलाय. या नाराजीनाट्यानंतर ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईल, असं सांगून तटकरेंनी भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न केले आहेत...
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे छगन भुजबळांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली असली तरी त्यांनी उपस्थित केलेला 'समान न्यायाचा' मुद्दा भविष्यात महायुतीची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. मुळात छगन भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ हे स्वत: विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते स्वत: मंत्री आहेत. मात्र त्यांना आता पुतण्या समीर भुजबळांचंही पुनर्वसन करण्याचे वेध लागले आहेत. कारण सत्तेच्या लालसेचा वारसाहक्क सांगणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना आता नव्या तटकरे पॅटर्नचे वेध लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.