चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद
दारूच्या नशेत झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हिंसक
मोठ्या भावाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात धाकट्या भावाचा मृत्यू
आरोपीला बेड्या,पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या किरकोळ वादातून भयंकर घडलं. सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादानंतर मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने जीवघेणे वार केले. या हल्ल्यात रमेश श्रीराम बनकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघेही एकत्र राहत होते. रक्षाबंधनानिमित्त त्यांची बहीण घरी आली होती. बहिणीच्या स्वागतासाठी घरात मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश यांच्यात वाद सुरू झाला.
दोघेही दारूच्या नशेत असल्याने सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापाच्या भरात जगनने घरात असलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि रमेश यांच्या मानेवर तसेच डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुऱ्हाडीचे वार अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान, भिसी पोलीस आणि शंकरपूर चौकीच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन बनकर याला अटक केली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.