माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री तीन तरुणांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. गोलवाडी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणांनी घराच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून गोंधळ घातला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री तीन तरुणांनी अचानक संजय शिरसाट यांच्या घराच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित तरुणांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतले असून, या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिस आयुक्तांचा फोन बंद होता. तसेच एकही डीसीपी किंवा एसीपी घटनास्थळी आले नाहीत, असे शिरसाट यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असताना तरी पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले.
या प्रकारानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी फोनवर संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. या घटनेमुळे मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तिन्ही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दगडफेक करण्यामागील कारण आणि या घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.