अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला: जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विषयपत्रिकेसोबत टिपणी जोडण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण सभेदरम्यान भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक आपपसात भिडले. सभागृहात सुरू झालेला वाद नंतर सभागृहाबाहेरही पोहोचला, यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला. या मारहाणीत हिवरखेड नगरपालिकेतील शिंदे गटाचे गटनेते रवी घुंगड आणि नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे जखमी झाल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
दरम्यान, भाजपच्या नगराध्यक्षा सुलभा धुतोंडे यांच्या पती आणि मुलांनी गुंडांसारखी मारहाण केल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेचे गटनेते रवी घुंगड यांनी केला आहे. या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. घटनेनंतर हिवरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिंदेसेना आणि भाजपची युती आहे. मात्र स्थानिक पातळीवर अजूनही मनोमिलन झाले नसल्याचे या घटनेतून दिसून आले. आता यावर वरिष्ट पातळीवर काय दखल घेतली जाते हे पाहणे महत्वच ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.