सचिन बनसोडे
Ahmednagar News: महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या शिर्डी मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूकीत थोरात-कोल्हे युतीने विखे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे. १९ पैकी १८ जागेवर दणदणीत विजय मिळवत थोरात-कोल्हे युतीच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलचा धुव्वा उडवला. विखेंना त्यांच्याच मतदारसंघात भाजपच्याच युवा नेत्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest Marathi News)
कोपरगाव मतदारसंघात असताना गणेश सहकारी साखर कारखान्यावर स्व.शंकरराव कोल्हे यांची ३७ वर्ष सत्ता होती. मात्र नंतर कोपरगावचे विभाजन होऊन शिर्डी मतदारसंघात वेगळा झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती.
तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला.. मागील विधानसभेत झालेल्या आई स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचा वचपा विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात काढल्याचं बोललं जात आहे.
शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता होती. यावेळी मात्र विखे पाटील यांच्या विरोधात भाजपच्याच कोल्हे गटाने दंड थोपाटले होते. ऐनवेळी कोल्हे गटाने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आणि परीवर्तन मंडळाच्या माध्यमातून विखें विरोधात रान पेटवले होते.
त्याचा परीणाम असा झाला की १९ पैकी १८ जागा मतदारांनी कोल्हे -थोरात गटाच्या पारड्यात टाकल्या आहेत. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावूनही त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अवघी एक जागा जिंकता आली.
विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी, राहाता, अस्तगाव आणि गणेशनगर परीसरील मतदारांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. विखे पाटलांचा थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात वाढलेला हस्तक्षेप आणि विधानसभा निवडणुकीत विखेंनी कोपरगावमध्ये साथ न दिल्याचं शल्य भाजपच्या कोल्हे यांच्या मनात होतं.
परिणामी या दोन्ही नेत्यांनी गणेशच्या निवडणुकीत एकत्र येत विखेंचा पराभव केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
विखे पाटलांना त्यांच्याच मतदारसंघात मात देणे अशक्य वाटत असताना, "तो आला, लढला आणि जिंकला" अशी चर्चा अहमदनगर जिल्ह्यात आहे.. त्यामुळे गणेश कारखान्याच्या निमित्ताने विखेंना शह देणारे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची आता राज्यभर चर्चा होत आहे.
कोण आहेत विखेंना शह देणारे विवेक कोल्हे?
३३ वर्षीय विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. विविध ८ ते १० सहकारी संस्थानवर सदस्य आहेत.
त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण नाशिक येथे पुर्ण करून बीई सिव्हील पदवी प्राप्त केली. २०१७ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
आजोबा स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणांची संघटन बांधणी केली. गणेश कारखाना निवडणुकीत थोरात - कोल्हे युतीत किंगमेकरची भूमिका निभावली. विखेंना त्यांच्याच मतदारसंघात शह देत आता राज्यभरात चर्चेत आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.