ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना जालना जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. अंबडमधील काँग्रेस तालुकाध्यक्षांसह ५ विद्यमान आणि ६ माजी नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. १९) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडलाय.
जालना लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) महायुतीने पुन्हा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच दानवे निवडणुकीच्या तयारीला लागले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शुक्रवारी रावसाहेब दानवे अंबड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बड्या पदाधिकाऱ्यांना देखील भाजपात सहभागी करून घेतलं. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांच्या मुलगा केदार कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
केदार कुलकर्णी यांचा अंबड तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केल्याने अंबडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
मात्र, यावेळी भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी महाविकास आघाडीने मास्टर प्लान आखला आहे. मविआने डॉ. कल्याण काळे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ मध्ये डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली होती.
त्यावेळी काळे यांचा अगदी मोजक्याच मतांनी पराभव झाला होता. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली होती. कल्याण काळे यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराने दानवे यांना इतकी कडवी झुंज दिलेली नव्हती. यंदाही काळे विरुद्ध दानवे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
Edited by - Satish Daud Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.