
बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं आहे. बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या सत्रांमध्ये वाढ झालीय. याच पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांचा गुन्ह्याचा आढावा घेण्यात आलाय. गुन्हेगारांची आकडेवारी पाहता, २०२३ पेक्षा २०२४ साली गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालीय. प्रत्येक आठवड्याला एकाची हत्या होत असून, २ दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, हत्येचा प्रयत्न करण्याची नोंद करण्यात आलीय. तसेच महिला, मुलींवरही अत्याचार केल्याची एक घटना दोन दिवसाआड घडत आहेत. ज्यामुळे बीड जिल्ह्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १ हजार १४७ गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालीय. या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर बिघडलीच आहे, परंतु सामान्य नागरिकांसह महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर काही ठिकाणी किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठून कुन्हाड, तलवार, दगडाने ठेचून हत्या करण्यात येत आहे. यामुळे नागरीकांमध्ये पोलिसांची भीती कमी झाली आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
२०२४ या वर्षात ४० हत्या झाल्याची नोंद आहे. डिसेंबर अखेरीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्याने तर बीडच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. आता याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या हत्येनंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे बीडमधील सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष आणि गुन्हेगारांबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०२४ हे वर्ष निवडणुकींचे वर्ष होते. लोकसभेनंतर विधावसभा निवडणुका पार पडल्या. २०२४ वर्षी जातीय दंगलीही झाल्या. याचे दखलपात्र व अदखलपात्र असे २३७ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी, मारामार्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ३९१, तर २०२४ मध्ये ११ महिन्यांमध्ये ४६४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
२०२३ मध्ये जुगार अड्ड्यांवर धाड टाकत पोलिसांनी ७३५ गुन्हे दाखल केले होते. २०२४ मध्ये हा आकडा कमी होऊन ५९५ वर आला. दारूबंदीच्या कारवायांमध्ये ३५३ ने वाढ होऊन, २०९७ एवढ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तर २०२३ साली ११ महिन्यांत ६२ हत्येची नोंद झाली होती. आणि २०२४ मध्ये आतापर्यंत ४० हत्येची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सामान्यांची कामे करण्यासाठी सरकारी नोकर आहेत; परंतु त्यांच्यावरही काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. २०२३ मध्ये ४४ तर २०२४ साली ४९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पाच गुन्हे यावेळी वाढले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.