

अशोक खरातवर ५ गंभीर गुन्हे दाखल
गर्भपाताच्या गोळ्यांमागे डॉक्टरांचा संशय
महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण उघड
SIT तपासात आणखी धक्कादायक खुलासे अपेक्षित
Ashok Kharat Case: कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात अडकत चालला आहे. खरातवर आतापर्यंत ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये लैंगिक शोषण, छळ, फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. एका पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीदरम्यान महापालिकेच्या डॉक्टरांमार्फत खरातला गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याच समोर आलं आहे. या खुलाश्यानंतर संबंधित डॉक्टरांची चौकशी होणार असून या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांसह महापालिकेतील एका डॉक्टरनेही खरातला मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोपही पुढे आला आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
अशोक खरात हा स्वतःला “अवतारी पुरुष” असल्याचे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक समस्या किंवा आजारांवर उपाय सांगण्याच्या बहाण्याने तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.
तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, काही पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात होत्या. या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या जात होत्या, तसेच त्यामागे कोणते डॉक्टर किंवा सोनोग्राफी सेंटर्स सहभागी होते का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवली जात आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा गैरफायदा घेत महिलांचे शोषण करणाऱ्या अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. SIT चा तपास पुढे सरकत असताना या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी अजून समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.