पंढरपूर : आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे यंदाची वारी सुरक्षित, आरोग्यदायी आणि अधिक सुयोग्य व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा एकाच टीमप्रमाणे कामाला लावल्या असून, कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलीस, अग्निशमन, वीज, परिवहन, मंदिर समिती आणि इतर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. वारी संपल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडी 'यंदाचे नियोजन उत्कृष्ट होते' हेच शब्द असावेत. यासाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे सांगत त्यांनी, "जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त गरज कळवावी. नगरविकास विभागामार्फत तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट केले.
पंढरपूरच्या पायाभूत सुविधांसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीसह विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत ६७१ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची माहितीही त्यांनी दिली. या निधीतून रस्ते, पायाभूत सुविधा, दर्शन मंडप आणि इतर विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून अतिरिक्त ॲम्बुलन्स, आवश्यकतेनुसार बसेस, बसण्याची व्यवस्था तसेच प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमएसआरडीसीलाही एअर ॲम्बुलन्सची सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, सीसीटीव्ही यंत्रणा, वीजपुरवठा, स्वच्छता यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांकडूनही मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरीत व्हीआयपी कोणी नाही. मीही वारकरी म्हणून मुक्त दर्शन घेतले. प्रत्येक वारकऱ्याला सुलभ दर्शन मिळावे, हीच आमची भूमिका आहे," असे सांगत शिंदे यांनी यंदाच्या आषाढी पूजेचे आणि वारीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने अहोरात्र काम सुरू ठेवावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.