अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
श्रीकांत देशपांडे यांनी २०२० मध्ये 'व्होट चोरी'मुळे पराभव झाल्याचा आरोप केला आहे.
यंदा मतदार नोंदणीसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
देशपांडे विरुद्ध बच्चू कडू, रणजीत पाटील आणि किरण सरनाईक अशी दिग्गजांची लढत होणार आहे.
अक्षय गवळी, अमरावती प्रतिनिधी
सध्या देशात गाजत असलेला 'व्होट चोरी'चा मुद्दा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही गाजण्याची चिन्ह आहेत. २०२० मध्ये झालेल्या 'व्होट चोरी'मूळेच आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार आणि या निवडणुकीतील उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे.
राज्यात डिसेंबर २०२६ मध्ये होणार असलेल्या अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लगेच सुरूवात झाली आहे. या मतदारसंघात लगेच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. माजी आमदार आणि मागच्यावेळी थोडक्यात पराभूत झालेले उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी अकोला जिल्ह्यातून प्रचाराला सुरूवात केली आहे.
या प्रचारात मागील निवडणुकीत अपात्र लोकांच्या नोंदणीमूळे आपल्यासंदर्भात २०२० मध्ये 'वोट चोरी' झाल्याचा आरोप ते प्रचारातून करता येत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात यावेळी हाय व्होल्टेज लढत होणार आहे. माजी आमदार श्रीकांत देशपांडेंसह माजी राज्यमंत्री बच्चू कडू,
माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यासोबतच इतर दिग्गज उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मतदार नोंदणीसाठी यावेळी पहिल्यांदाच नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गठ्ठा पद्धतीने राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून होणारी मतदार नोंदणी यावेळी थांबविण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला स्वत:च स्वत:ची नोंदणी आयोगाकडे करावी लागणार आहे..
नमूना क्रमांक-19 मधील 'एकगठ्ठा' अर्ज मग ते व्यक्तिशः दाखल केलेले असो की पोस्टाने पाठविलेले. मतदार नोंदणीसाठी विचारात घेतले जाणार नाही, असा नियम यंदा लागू करण्याय आला आहे. तथापि, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख हे त्यांच्या संस्थेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील. एकाच पत्त्यावर राहणाऱ्या एखाद्या कुटुंबातील अन्य पात्र व्यक्तींचे अर्ज कुटुंबातील सदस्य दाखल करु शकेल आणि प्रत्येक सदस्याच्या संबंधातील मूळ प्रमाणपत्र सादर करुन प्रमाणपत्र सत्यापित करुन घेता येणार आहे. राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, रेसिडेन्ट वेलफेअर असोसिएशन यांना एकगठ्ठा अर्ज करता येणार नाहीत. दरम्यान, शिक्षक मतदार संघातील अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक ते पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.