

अंबाजोगाईतील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांच्या मॅरेथॉन कामगिरीची राज्यभर चर्चा
रमाबाई यांनी अनेक धावपटूंना मागे टाकत मॅरेथॉनमध्ये विजय मिळवला
लेकीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी त्यांनी ही धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे.
परिस्थिती कितीही हलाखीची असो, जर मनात जिद्द आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता असेल, तर काहीही अशक्य नसतं. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय अंबाजोगाईमधील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांनी. अंगावर साधी साडी, पायात साधी स्लीपर आणि मनात लेकींच्या शिक्षणाची आस.सध्या त्यांच्या या संघर्षाची कहाणी संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरलीये.त्याला कारण आहे ते मॅरेथॉन स्पर्धेचं.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंबाजोगाईत 'अमृत दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.याच गर्दीत सर्वात मागच्या रांगेत साध्या साडीत रमाबाई उभ्या होत्या. लोकांना वाटले त्या केवळ गंमत म्हणून आल्या असाव्यात. मात्र, ध्वज फडकला, शिट्टी वाजली आणि त्या मॅरेथॉनमध्ये धावू लागल्या. ओला रस्ता, पायाला टोचणारे खड़े अशा प्रतिकूल परिस्थितीत साडीचा पदर सांभाळत त्या धावत होत्या.
पायात घातलेली स्लीपर निसटू लागल्यानं अखेर रमाबाई स्लीपर हातात धरून अनवाणी धावू लागल्या. पायत शूज, अंगात जर्सी घातलेल्या अनेक स्पर्धकांना मागे टाकत रमाबाईंनी सर्वांनाच अवाक करत या मॅरेथॉनमध्य़े प्रथम क्रमांक पटकावला. आणि मुलीच्या शिक्षणासाठी 3 हजारांचं बक्षीस पटकावलं.
पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याचं स्वप्न त्यांनी बाळगलंय. मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत लोकांकडे स्वयंपाकाचं काम करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. विशेष म्हणजे, याआधी वयाच्या 60व्या वर्षी लता भगवान करे यांनी आपल्या आजारी पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून अनवाणी पायांनी मॅरेथॉन जिंकली होती. आता अंबाजोगाईतील रमाबाई धावल्यात आपल्या मुलीसाठी आणि तिच्या शिक्षणासाठी. त्यामुळे एक स्त्री जिद्दीला पेटली तर ती कोणत्याही संकटाला हरवू शकते हेच रमाबाईंनी सिद्द करून दाखवलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.