राज्याची आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे याचा बोलका पुरावा अकोल्यातील एका घटनेने समोर आलाय.जिल्हा रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा भेसूर चेहरा चीड आणणारा आहे. शासकीय रुग्णालयात एका आदिवासी महिलेला आपल्या रुग्ण पतीला चक्क पाठीवर घेत धावपळ करावी लागली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने 'ब्रेन स्ट्रोक' म्हणजेच मेंदुचा पक्षघात झालेल्या पतीच्या उपचारासाठी ही महिला जीवाच्या आकांताने धावपळ करत होती. या धक्कादायक प्रसंगावरुन प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेवर राज्यभरातून टीका होतीये.
या महिलेचा पतीच्या उपचारासाठीचा संघर्ष हृदय हेलावून टाकणारा आहे. पोटाला बांधलेली बॅग आणि पाठीवर पती अशा अवस्थेत उपचार कक्षाचा शोध घेणारा हा व्हिडिओ उदासीन आरोग्य व्यवस्थेवर अनेक सवाल उपस्थित करतोय. मात्र, संतापाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय सोनवणे यांनी हा व्हिडिओ AI असू शकतो, असा अजब दावा केलाय. या संदर्भात कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार देत सखोल चौकशी करून तुम्हाला माहिती दिली जाईल, असं सांगितलं आहे. मात्र, ज्या महिलेने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला, तिचा साम टिव्हीनं शोध घेतला. या महिलेने रुग्णालयात काय घडलं ते साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.
या घटनेवरुन राजकीय पटलावरही तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.काही दिवसांपूर्वीच अडीच महिन्यांच्या लेकीचा मृतदेह आजोबांना रात्रभर मांडीवर घेऊन बसावं लागलं होतं.महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली होती. त्यानंतर आता अकोल्यात एका पत्नीवर आपल्या आजारी पतीला उपचारांसाठी चक्क पाठीवर वाहून नेण्याची वेळ आलीये. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत ढीम्म प्रशासनावर सरकार कारवाई करणार का ? मुर्दाड आरोग्य यंत्रणेला आतातरी जाग येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.