

जंतर-मंतरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून शिवीगाळ झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झालीये . या प्रकरणात काही तरुणांवर एफआयआरही दाखल करण्यात आला असून आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेली भाषा योग्य होती का, यावरही प्रश्न उपस्थित केलं जातंयत.
याच पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधत आपली भूमिका मांडली. शिवीगाळचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट करत, केवळ एखादा शब्द वापरल्यामुळे तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.
अभिजीत म्हणाले, "भाषा ही व्यक्त होण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे कोणालाही शारीरिक इजा होत नाही. याचा अर्थ मी शिवीगाळीचं समर्थन करतोय असा नाही. गेल्या महिनाभर चाललेल्या आंदोलनात आम्ही अशा प्रकारचे शब्द वापरले नव्हते. मात्र, शिवी देणं हा गुन्हा आहे का, हा माझा प्रश्न आहे. नैतिक किंवा सामाजिकदृष्ट्या ते चुकीचं आहे, यावर चर्चा होऊ शकते. पण तो असा गुन्हा नाही की त्यासाठी थेट एफआयआर दाखल केला जावा. परंतु, शिवी देणं हा असा कोणता गुन्हा आहे ज्याच्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा २५ वर्षांच्या मुलांमागे लावली जात आहे?"
ते पुढे म्हणाले, "जर शिवीगाळीवर एफआयआर करायचा असेल, तर देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा लागेल. आजपर्यंत शिवी न दिलेला माणूस शोधणं कठीण आहे. संसदेत रमेश बिधुरी यांनी वापरलेले शब्द, योगी आदित्यनाथ यांनी कॅमेरापर्सनसाठी वापरलेली भाषा किंवा पंतप्रधानांनी '५० कोटींची गर्लफ्रेंड' असा केलेला उल्लेख यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. मग नियम फक्त तरुणांसाठीच आहेत का? नेत्यांसाठी वेगळे नियम आहेत का?"
अभिजीत म्हणाले, "मी शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण २० ते २५ वर्षांच्या मुलांकडून एखादा चुकीचा शब्द निघाला, तर त्यांना समजावून सांगायला हवं. त्यांनी माफी मागितली, तर विषय तिथेच संपवायला हवा. त्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचं करिअर धोक्यात घालणं योग्य नाही."
ते पुढे म्हणाले, "एका २४-२५ वर्षांच्या मुलीकडून चुकीने एखादा शब्द निघाला म्हणून तिच्यावर एफआयआर करून संपूर्ण यंत्रणा तिच्या मागे लावणं योग्य नाही. भाजपच्या आयटी सेलमधील अनेक लोक सोशल मीडियावर महिलांविषयी अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहितात. मात्र, अशा किती जणांवर एफआयआर होतो, हाही प्रश्न विचारण्याची गरज आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.