Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

Kalyan Dombivli Vidhan sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election 2024) कल्याण डोंबिवली मधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीचे तीन आणि मनसेचा एक आमदार आहे. महाविकास आघाडी खातं उघडणार का?
Raju Patil and Eknath Shinde
Raju Patil and Eknath ShindeSaam tv
Published On

अभिजित देशमुख,

Kalyan Dombivli Vidhan sabha election 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election 2024) कल्याण डोंबिवली मधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडी (mahayuti vs mva) मधील घटक पक्षामधील स्थानिक नेत्यांनी विधानसभा मतदार संघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील चारही मतदार संघात बंडाळीची शक्यता आहे. येथील पदाधिकाऱ्यांची समजूत काढताना महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.

कल्याण डोंबिवली शहरात कल्याण पूर्व , कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली असे चार विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील तीन मतदारसंघ कल्याण लोकसभा क्षेत्रात येतात. श्रीकांत शिंदे हे या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून गेले आहेत, तर कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भिवंडी लोकसभा क्षेत्रात येतो. यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची हट्रिक रोखत पराभवाची धूळ चारली.

कोणत्या मतदारसंघात कोण आमदार ?

कल्याण डोंबिवलीतील तीन मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत तर एक मतदारसंघ मनसेच्या ताब्यात आहे. यामधील कल्याण पूर्वेत भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहेत, कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत, डोंबिवलीत भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत, तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत.

कोण कोण इच्छूक उमेदवार -

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर याना 3 लाख 80 हजार मतदान झाल्याने ठाकरे गटाचा हुरूप वाढला आहे. तर ठाकरे गटाच्या मतांचा आकडा पाहता महायुतिच्या उमेदवारांसमोर तगडे आवाहन असणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेचे राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे . कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे आमदार राजू पाटील पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. डोंबिवलीमधून मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर ,पदाधिकरी प्रल्हाद म्हात्रे इच्छुक आहेत तर कल्याण पश्चिम मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर ,माजी आमदार प्रकाश भोईर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Raju Patil and Eknath Shinde
Aamdar Yadi: आमदारकीच्या निवडणुका कधी? महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी एका क्लिकवर!

कल्याण पूर्व - सत्ताधाऱ्यांमध्येच कलह, विरोधक बाजी मारणार का? Kalyan East Assembly constituency

कल्याण पूर्व मतदारसंघातून आमदार गणपत गायकवाड हे सलग तीनदा आमदार राहिलेत. 2009 साली पहिल्यांदा शिवसेनेचा उमेदवाराला पराभूत करत गणपत गायकवाड अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा भाजप शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभूत करून दुसऱ्यांदा अपक्ष निवडून आले. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी भाजपला समर्थन दिले. 2019 मध्ये महायुतीमधून गणपत गायकवाड यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत तिसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले. 2019 मध्ये आमदार गायकवाड यांच्या समोर शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे यांचे आवाहन होते. गायकवाड यांनी बोडारे याना पराभूत करत हट्रिक केली. मात्र त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडू लागले.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले. मात्र कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे स्थानिक शहरप्रमुख महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातला वाद विकोपाला गेला. याच वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर कल्याण पूर्व मधील राजकारण ढवळून निघाले. सध्या गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहेत, तर या मतदारसंघावर आता शिवसेना शिंदे गटाने दावा केलाय. शिवसेना शिंदे गटाकडून निलेश शिंदे , महेश गायकवाड, विशाल पावशे ,नवीन गवळी हे नाव चर्चेत आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील हा मतदार संघ सोडणार नसल्याची भूमिका घेतली. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यादेखील राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.

बंडखोरी कशी रोखली जाणार ?

भाजपने सुलभा गायकवाड यांना विधानसभा प्रमुख हे जबाबदारी देऊन केली. भाजपा सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देणार असल्याचे देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने उमेदवारी न दिल्यास सुलभा गायकवाड या अपक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येतेय. तर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास शिवसेना शिंदे गटाकडून देखील बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे एकंदरीतच या मतदारसंघावरून शिवसेना, भाजपा मध्ये चांगलेच रस्सी खेच होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील शिवसेना ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे हे तीन नावं चर्चेत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या मतदारसंघावर दावा केलाय. काँग्रेसकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्या मतदारसंघावर धावा करत याबाबत वरिष्ठांकडे देखील मागणी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले .त्यामुळे आता महाविकास आघाडीतून हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Raju Patil and Eknath Shinde
Karad South Assembly: कराड दक्षिणचे बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?

कल्याण पश्चिमचं नेमकं गणित काय? Kalyan West Assembly constituency

कल्याण पश्चिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना या मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून इच्छुकांची संख्या वाढत आहे. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, शिवसेना पदाधिकारी श्रेयस समेळ हे देखील या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील या मतदार संघावर दावा केलाय. भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पवार हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे एकंदरीतच कल्याण पश्चिम ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे.

महाविकास आघाडी कडून या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बासरे हे इच्छुक आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यादेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा आता कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसेचे प्रकाश भोईरे 2009 साली निवडून आले होते, मात्र त्यानंतर दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. या मतदारसंघात मनसेची ताकद आहे. कल्याण पश्चिम मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर ,माजी आमदार प्रकाश भोईर  निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यंदा मनसे या ठिकाणी या मतदारसंघात उमेदवार देणार का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे .

Raju Patil and Eknath Shinde
kalyan Rural : कल्याण ग्रामीणमध्ये कोण बाजी मारणार? महायुती आणि मविआच्या लढाईत मनसेचं इंजिन सुसाट धावणार का?

भाजपच्या बालेकिल्ल्यात यंदा काय होणार? Dombivli Assembly constituency

डोंबिवली मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. भाजपचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांच्यासमोर यंदा ठाकरे गटाचे आवाहन असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार वैशाली दरेकर पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी डोंबिवलीमधून इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून उमेदवारी कोणाला मिळते, हे पाहणं देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेकडून डोंबिवलीमधून मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, पदाधिकरी प्रल्हाद म्हात्रे इच्छुक आहेत.

मनसेच्या राजू पाटलांना एकनाथ शिंदे मदत करणार का ? Kalyan Rural Assembly constituency

२०१९ मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव करत मनसेचे राजू पाटील हे निवडून आले होते. तत्कालीन विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारत शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेचे नेते राजू पाटील यांनी रमेश म्हात्रे यांना पराभूत केलं होतं. मनसे आमदार राजू पाटील व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचे देखील पाहायला मिळाले, मात्र लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराना पाठिंबा दिला. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघात श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरम्यान कल्याण ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटातून राजेश मोरे , महेश पाटील हे नाव चर्चेत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना केलेले मदत पाहता या मतदारसंघात शिवसेना मनसेला मदत करेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेतात, तसेच शिवसेना शिंदे गट राजू पाटील यांनी केलेल्या मदतीची परतफेड करणार का? हे पाहणं देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे .

Raju Patil and Eknath Shinde
Kalamnuri Assembly Constituency: कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय? महाविकास आघाडी की महायुती, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

2024 लोकसभा निवडणुकीत विधानसभा निहाय मतदान

कल्याण पूर्व

आमदार - भाजप गणपत गायकवाड -

श्रीकांत शिंदे- 87,129

वैशाली दरेकर - 54,533

कल्याण ग्रामीण

आमदार - मनसे राजू पाटील

श्रीकांत शिंदे- 1,51,702

वैशाली दरेकर - 65,407

डोबिवली

आमदार - भाजप रवींद्र चव्हाण

श्रीकांत शिंदे :- 99,734

वैशाली दरेकर :- 34,531

कल्याण पश्चिम

आमदार - शिवसेना शिंदे गट विश्वनाथ भोईर

कपिल पाटील-  1,05,365

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा-  74,129

-----------------------------------------------------

2019 विधानसभा निवडणूकीचे निकाल

डोंबिवली

भाजप -रवींद्र चव्हाण :- 86 हजार 227

मनसे - मंदार हळबे :- 44 हजार 916

कल्याण पूर्व

भाजप - गणपत गायकवाड-60,332

शिवसेना बंडखोर - धनंजय बोडारे- 48 हजार 75

कल्याण ग्रामीण

मनसे - राजू पाटील-93 ,927

शिवसेना - रमेश म्हात्रे - 86,773

कल्याण पश्चिम

शिवसेना -विश्वनाथ भोईर - 65,480

भाजप बंडखोर - नरेंद्र पवार - 43,209

मनसे - प्रकाश भोईर - 38,075

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com