

पुरुषांपेक्षा महिलांना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता तब्बल तीनपट जास्त असल्याचे तज्ञ सांगतात. त्यातील जवळपास ३० टक्के मायग्रेनची समस्या ही हॉर्मोन्समधील बदलांमुळे, विशेषत: मासिक पाळीच्या आधी आणि या दिवसांमध्ये जाणवते. काम, घर, जबाबदाऱ्या आणि या सगळ्याच्या ताणामुळे तारेवरची कसरत करत असताना ही डोकेदुखी अनेक महिलांसाठी रोजचीच आणि सामान्य समस्या बनली आहे.
मुंबईतील लिलावती रुग्णालयात कार्यरत डॉ. के. रविशंकर यांच्या मते, ''हॉर्मोन्सचे बदल हे महत्त्वाचे कारण असले तरीही ते संपूर्ण चित्राचा एकच भाग आहे. ताण, थकवा, उपवास, झोपेतील अनियमितता आणि जीवनशैलीतील बदलही मायग्रेनला चालना देऊ शकतात.'' त्यामुळे मायग्रेनची कारणे ओळखणं आणि त्यानुसार बदल करणं हे सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरते.
मायग्रेन टाळण्यासाठी ७ सोपे आणि प्रभावी मार्ग
1. हॉर्मोन्सची भूमिका समजून घ्या
मासिक पाळीच्या आसपास मायग्रेन वाढत असेल तर हे हॉर्मोनल बदलांमुळे असू शकते. या दिवसांमध्ये पुरेशी झोप, संतुलित आहार, पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम या सवयी फॉलो केल्याने आराम मिळेल.
2. ताणतणाव कमी करा
काम-घराची जबाबदारी सांभाळताना महिलांवर ताण येतो. या ताणामुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि मायग्रेनला सुरुवात होते. योगा, ध्यानधारणा, श्वसनाचे व्यायाम आणि मायग्रेन डायरी ठेवणं यामुळे फायदा होतो.
3. शेड्यूल नियमित ठेवा
वेळी-अवेळी झोपणे, जेवण टाळणे किंवा पाणी न पिणे यामुळे मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. त्यासाठी ठराविक वेळेवर झोपणे-उठणे, पाण्याची बाटली जवळ ठेवणे आणि तीन-चार तासांनी काहीतरी खाणे फायदेशीर ठरते.
4. कॅफिनचे प्रमाण नियंत्रित ठेवा
काहींना कॅफिनमुळे आराम मिळतो, तर काहींमध्ये उलट मायग्रेन वाढतो. त्यामुळे कॅफिन तुमच्या शरीरावर कसा परिणाम करते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दुपारी आणि रात्री कॅफिन टाळा.
5. आहारात सुधारणा करा
प्रोसेस्ड फूड, चीज, कृत्रिम स्वीटनर्स आणि वेळी-अवेळी खाणे ही मायग्रेनची कारणे असू शकतात. ताजी फळे, भाज्या, प्रथिनयुक्त आहार आणि नट्स यांचा समावेश करा. फूड डायरी उपयुक्त ठरते.
6. हाय-रिस्क दिवसांसाठी तयार राहा
औषधे नेहमी जवळ ठेवा आणि सुरुवातीची लक्षणे दिसताच घ्या. सूर्यप्रकाश, आवाज, थकवा यांपासून बचाव करा. सनग्लासेस, इअरप्लग्ज, थंड घडी किंवा लॅव्हेंडर ऑईलही आराम देतात.
7. गरज भासल्यास वैद्यकीय मदत घ्या
वारंवार किंवा तीव्र मायग्रेन होत असेल तर न्युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आज उपलब्ध आधुनिक उपचारांमुळे जसे CGRP औषधे, न्युरोमॉड्युलेशन मायग्रेन नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.