Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Stress and brain function: दीर्घकाळचा तणाव मेंदू, स्मरणशक्ती, झोप आणि हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. कॉर्टिसोल हार्मोन वाढल्यामुळे विचारशक्ती कमी होते. मेडिटेशन, व्यायाम आणि सकारात्मक सवयींमुळे तणाव नियंत्रणात ठेवता येतो.
Chronic stress effects
Chronic stress effectsSAAM TV
Published On

आजच्या धावपळीच्या जगात मानसिक शांतता जपणं कठीण होतंय. कामाचा ताण, पैशांची चिंता, घरची जबाबदारी आणि सोशल मीडियाचा सततचा प्रभाव यामुळे अनेकांच्या मनावर सतत दडपण असतं. हे दडपण कधी कधी सामान्य वाटतं, पण ज्यावेळी ते दीर्घकाळ टिकतं, तेव्हा ते शरीर आणि मन दोन्हींसाठी गंभीर ठरू शकतं.

डॉक्टरांच्या मते, ताण काही प्रमाणात नैसर्गिक असला तरी सततचा स्ट्रेस हा मानसिक आरोग्याला हळूहळू कमजोर करत जातो. सुरुवातीला तो फक्त चिडचिड, अस्वस्थता किंवा चिंता या स्वरूपात दिसतो. मात्र वेळ जसजसा पुढे जातो, तसतसं त्याचे परिणाम अधिक गंभीर होत जातात आणि त्यातून नैराश्य, झोपेच्या समस्या तसंच एकाग्रता कमी होणं अशा अडचणी निर्माण होऊ शकतात.

हार्वर्ड हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला जर दीर्घकाळ स्ट्रेस असेल तर मेंदूतील कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो. तणावाच्या काळात शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. हा हार्मोन मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागावर परिणाम करतो. हा भाग विचार करणं, निर्णय घेणं, लक्ष केंद्रित करणं आणि समस्या सोडवणं यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे सतत तणावात राहणाऱ्या व्यक्तीची निर्णयक्षमता आणि विचारशक्ती कमजोर होऊ शकते.

Chronic stress effects
Dengue Fever: प्लेटलेट्स नॉर्मल असूनही डेंग्यूचा धोका असतो का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

स्मरणशक्तीवरही होतो ताणाचा परिणाम

तणावाचा थेट परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. हार्वर्ड हेल्थच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कॉर्टिसोल वाढल्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस या भागावर परिणाम होतो. हा भाग नवीन गोष्टी शिकणं आणि आठवणी तयार करण्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विसरभोळेपणा, शिकण्यात अडचणी आणि माहिती लक्षात ठेवण्यात त्रास होऊ शकतो.

तणावामुळे दैनंदिन कामांवरही परिणाम दिसतो. व्यक्तीला कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. याचा परिणाम केवळ कामावर नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही होतो.

झोपोवर होतो परिणाम

झोपेवरही तणावाचा मोठा परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, तणावग्रस्त व्यक्ती सतत एकाच विचारात अडकून राहते. त्यामुळे रात्री झोप येण्यास उशीर होतो किंवा झोप वारंवार तुटते. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, सुस्ती वाढते आणि शरीरात ऊर्जा कमी होते.

Chronic stress effects
Women's health: पीसीओएसचं नाव बदलून पीएमओएस; आता डोळ्यांवरही होऊ शकतो गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

तणाव केवळ मेंदूपुरता मर्यादित राहत नाही तर त्याचा शरीरावरही खोल परिणाम होतो. हार्वर्ड हेल्थच्या निरीक्षणानुसार, तणावाच्या काळात हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. यासोबतच अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते, दीर्घकाळ तणावामुळे शरीरातील स्नायू सतत ताणलेल्या अवस्थेत राहतात. ज्यामुळे मान, पाठ आणि खांद्यात वेदना होण्याची शक्यता वाढते.

पचनक्रियेवरही तणावाचा परिणाम होतो. मेंदू आणि पोट यांच्यातील कार्यात बिघाड झाल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. काही लोकांमध्ये भूक कमी होते, तर काहींमध्ये जास्त खाण्याची सवय वाढते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

Chronic stress effects
Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तणाव हा फक्त मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा, मेडिटेशन, हलका व्यायाम, आवडत्या व्यक्तींशी संवाद साधणं, मित्रांसोबत वेळ घालवणं किंवा म्युझिक ऐकणं यासारख्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com