

पीसीओएसचं नाव बदलून पीएमओएस करण्यात आलंय. यामुळे हा आजार केवळ अंडाशयांपुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीरावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचं समजतं. शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेत होणाऱ्या बदलांमुळे डोळ्यांनाही नुकसान होऊ शकतं. हे आता अधिक स्पष्ट झालंय.
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून जगभरातील कोट्यवधी महिला ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ म्हणजेच पीसीओएसचा सामना करतायत. मात्र या आजाराचं नाव त्याच्या खऱ्या स्वरूपाशी पूर्णपणे जुळत नसल्याचं संशोधनातून समोर आलंय. तब्बल ११ वर्षे चाललेल्या आणि २२ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग असलेल्या व्यापक संशोधन आणि चर्चेनंतर या आजाराचे नाव बदलून ‘पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीएमओएस) असं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मे २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट’च्या अहवालानुसार, यापुढे या आजाराचा उल्लेख ‘पीएमओएस’ या नावाने केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ हे नाव तांत्रिकदृष्ट्या अचूक नव्हतं. कारण अल्ट्रासाऊंडमध्ये दिसणाऱ्या सिस्ट या प्रत्यक्षात आजाराच्या गाठी नसून वाढ थांबलेली स्त्रीबीजं (अरेस्टेड फॉलिकल्स) असतात.
एएसजी आय हॉस्पिटलचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि बोर्ड डायरेक्टर डॉ. हिमांशु शेखर यांनी, आजाराचं नाव बदलण्याचा आणि डोळ्यांच्या आरोग्याचा नेमका काय संबंध आहे? हे सांगितलं. प्रत्यक्षात हा संबंध अनेकांच्या कल्पनेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.
आता अधिकृतपणे हे मान्य करण्यात आलंय की, पीएमओएस हा केवळ प्रजनन सिस्टीमशी संबंधित आजार नाही. या आजाराचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर एकाच वेळी होऊ शकतो. हार्मोन्सचं संतुलन, चयापचय प्रक्रिया, प्रजनन क्षमता, त्वचेचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य या सर्वांवर त्याचा परिणाम होतो.
यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आजाराचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत पीसीओएस हे नाव प्रामुख्याने प्रजनन अवयवांशी जोडले गेले होते. त्यामुळे डोळ्यांसारख्या इतर अवयवांवर होणाऱ्या परिणामांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही.
तज्ज्ञांच्या मते, पीएमओएस आणि डोळ्यांच्या समस्यांमधील संबंध मुख्यतः दोन कारणांमुळे निर्माण होतो. पहिले म्हणजे शरीरातील अँड्रोजन हार्मोनची वाढलेली पातळी आणि दुसरे म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच शरीराने इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर न करणे.
मेइबोमियन ग्रंथी या पापण्यांच्या आतील बाजूस असलेल्या लहान ग्रंथी असतात. या ग्रंथी तेलासारखा पदार्थ तयार करतात, जो डोळ्यांतील अश्रू लवकर सुकू देत नाही आणि डोळ्यांचे संरक्षण करतो.
संशोधनात असं आढळून आलंय की, पीएमओएस असलेल्या महिलांमध्ये या ग्रंथींचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. शरीरातील अंतर्गत सूज, अँड्रोजन हार्मोन्सची वाढलेली पातळी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स ही यामागील प्रमुख कारणं मानली जातात. विशेषतः इन्सुलिन रेझिस्टन्स हा असा घटक आहे, ज्याचे निदान अनेकदा उशिरा होतं किंवा तो लक्षात येत नाही.
इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. याचा परिणाम डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर होतो आणि त्या हळूहळू खराब होऊ लागतात. त्यामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’सारखे गंभीर डोळ्यांचे विकार होण्याचा धोका वाढतो.
याशिवाय, शरीरात दीर्घकाळ राहणारी सूज ‘युव्हाइटिस’ या आजाराला कारणीभूत ठरू शकते. या स्थितीत डोळ्याच्या मधल्या थराला सूज येते आणि दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
अलीकडील संशोधनांमध्ये डोळ्याच्या रेटिनाशी संबंधित काही नवीन निष्कर्षही समोर आलेत. काही अभ्यासांमध्ये पीएमओएसमुळे रेटिनल नर्व्ह फायबर लेयरचे संरक्षण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, इतर अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की, इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि इतर चयापचयाशी संबंधित समस्या असलेल्या महिलांमध्ये मॅक्युलाशी संबंधित विकारांचा धोका वाढू शकतो.
यामुळे डोळ्यांच्या मध्यभागातील दृष्टी कमकुवत होण्याची शक्यता वाढते आणि भविष्यात गंभीर दृष्टीदोष उद्भवू शकतात.
वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या आजाराचं नाव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कारण त्यावरूनच आजाराचे निदान, उपचारपद्धती आणि भविष्यातील संशोधनाची दिशा ठरते.
पीसीओएस हे जुने नाव केवळ अंडाशयांमधील सिस्ट किंवा गाठींवर लक्ष केंद्रित करणारं होतं. त्यामुळे या आजाराच्या हार्मोनल आणि चयापचयाशी संबंधित गंभीर पैलूंना पुरेसं महत्त्व मिळालं नाही. परिणामी, डोळ्यांसह शरीरातील इतर अवयवांवर होणाऱ्या परिणामांकडेही दुर्लक्ष झालं.
आता नवीन नाव पीएमओएस या आजाराचे हार्मोनल आणि चयापचयाशी संबंधित खरं स्वरूप स्पष्टपणे सांगतं. त्यामुळे उपचार प्रक्रियेत एंडोक्रिनोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नेत्ररोगतज्ज्ञ यांच्यातील समन्वय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.