

गेल्या काही वर्षात जिममध्ये व्यायाम करताना, मॅरेथॉन धावताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. अनेकजण अशा घटनांना हार्ट अटॅक समजतात. पण डॉक्टरांच्या मते, यापैकी अनेक प्रकरणे सडन कार्डियाक अरेस्ट (Sudden Cardiac Arrest) ची असू शकतात. ही अशी गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. ज्यामध्ये हार्टमध्ये बिघाड होऊन हार्ट अचानक धडधडणे थांबवते. अशावेळी काही मिनिटांत उपचार केला नाही, तर जीव धोक्यात येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सडन कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत. हार्ट अटॅक हा रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे येतो, तर सडन कार्डियाक अरेस्टमध्ये ह्रदयाची विद्यूत यंत्रणा बिघडल्यामुळे ह्रदयाचे ठोके अचानक थांबतात. त्यामुळे व्यक्ती काही क्षणांत बेशुद्ध पडू शकते.
विशेष म्हणजे, हा धोका फक्त वयोवृद्धांनाच नाही तर तंदुरुस्त दिसणाऱ्या तरुणांनाही असू शकतो. सततचा ताण, ह्रदयामध्ये जाणवणारा बदल, आनुवांशिक कारणे, बैठी लाइफस्टाइल किंवा वैद्यकीय तपासणी न करता अचानक खूप तीव्र व्यायाम करणे ही काही संभाव्य कारणे असू शकतात. त्यामुळे व्यायाम करताना छातीत दुखणे, धडधड वाढणे, सतत चक्कर येणे किंवा कुटुंबात अचानक ह्रदयविकारामुळे मृत्यूचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
अशा गंभीर परिस्थितीमध्ये ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) हे उपकरण जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. हे पोर्टेबल उपकरण हृदयाची लय तपासून आवश्यक असल्यास विद्युत धक्का देऊन ह्रदयाचे ठोके सुरळीच करण्यास मदत करते. विशेष म्हणजे, आधुनिक AED उपकरणामध्ये आवाजाच्या मदतीने स्पष्ट सूचना दिल्या जात असल्यामुळे वैद्यकीय प्रशिक्षण नसलेली व्यक्तीसुद्धा त्याचा वापर करू शकते.
डॉक्टरांच्या मते, सडन कार्डियाक अरेस्टच्या वेळी तातडीने सीपीआर (CPR) सुरू करणे आणि शक्य असेल तर AED चा वापर करणे रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी AED उपलब्ध असणे आणि नागरिकांना त्याच्या वापराबद्दल माहिती असणे ही काळाची गरज बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.