

हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले की, अनेकांच्या मनात लगेच एकच प्रश्न येतो आता स्टेंट बसवावाच लागेल का? पण प्रत्यक्षात प्रत्येक ब्लॉकेजसाठी स्टेंट लावण्याची गरज नसते. ब्लॉकेज किती टक्के आहेत यासोबतच रुग्णाला कोणती लक्षणं आहेत, हार्टपर्यंत रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतोय का आणि इतर तपासण्यांचं निष्कर्ष काय आहेत याचा विचार करूनच डॉक्टर स्टेंटचा निर्णय घेतात.
मेदांता मेडिसिटी मूलचंद हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांच्या माहितीनुसार, काही रुग्णांना तातडीने स्टेंट बसवावा लागतो तर काहींमध्ये केवळ औषधं आणि जीवनशैलीतील बदल पुरेसे ठरतात.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज असल्यास बहुतेक वेळा स्टेंटची गरज भासत नाही. अशा रुग्णांवर औषधांच्या मदतीने उपचार केले जातात. त्याचबरोबर आहारात बदल करणं, नियमित व्यायाम करणं आणि धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असल्यास ती पूर्णपणे सोडण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारच्या ब्लॉकेजमध्ये हार्ट अटॅकचा धोका तुलनेने कमी असतो. अनेकदा ही समस्या एंजिओग्राफी तपासणीदरम्यानच लक्षात येते.
रक्तवाहिनीत 50 ते 69 टक्के ब्लॉकेज असल्याचा अर्थ असा नाही की लगेच स्टेंट बसवावा लागेल. केवळ एंजिओग्राफीच्या अहवालावर किंवा ब्लॉकेजच्या टक्केवारीवर हा निर्णय घेतला जात नाही. जर रुग्णाला छातीत दुखणं, धाप लागणं किंवा इतर कोणतीही त्रासदायक लक्षणं नसतील आणि हार्टमध्ये रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होत असेल तर औषधांवरच उपचार सुरू ठेवलं जाऊ शकतात.
अशा वेळी डॉक्टर स्ट्रेस टेस्ट, एफएफआर किंवा आयएफआर यांसारख्या तपासण्या करतात. या चाचण्यांमधून ब्लॉकेजमुळे रक्तपुरवठ्यावर किती परिणाम झाला आहे, हे समजतं. जर रक्तप्रवाहात अडथळा असल्याचं दिसून आलं तरच स्टेंट बसवण्याचा विचार केला जातो.
ब्लॉकेज 70 ते 89 टक्क्यांपर्यंत पोहोचले आणि रुग्णाला वारंवार छातीत दुखणं, चालताना त्रास होणं किंवा हार्टला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याची लक्षणं दिसत असतील तर स्टेंट बसवण्याचा सल्ला दिला जातो. ब्लॉकेज हार्टच्या मुख्य कोरोनरी रक्तवाहिनीत असेल तर स्टेंटची गरज अधिक असू शकते.
मात्र यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर असते आणि त्यांना कोणतीही लक्षणं नसतात. अशा रुग्णांमध्ये डॉक्टर औषधं, नियमित तपासण्या आणि सतत देखरेख ठेवून उपचार करू शकतात.
रक्तवाहिनीतील ब्लॉकेज 90 ते 99 टक्क्यांपर्यंत गेली तर ती रक्तवाहिनी जवळपास बंद होण्याच्या स्थितीत असते. अशा वेळी रुग्णाला सतत छातीत दुखणं, हार्टला रक्ताचा पुरवठा कमी झाल्याची लक्षणं दिसत असतील किंवा हार्ट अटॅक आला असेल तर शक्य तितक्या लवकर स्टेंट बसवणं आवश्यक असतं.
डॉ. तरुण कुमार सांगतात की, एखाद्या रुग्णाला अचानक तीव्र हार्ट अटॅक आला असेल तर अशा परिस्थितीत तातडीने एंजिओप्लास्टी करून स्टेंट बसवला जातो. हा उपचार अनेकदा जीव वाचवणारा ठरतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.