

वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरू करायचा असेल तर चालणं हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो. यासाठी महाग सामान, जिमची फी किंवा हेवी व्यायामाची गरज नसते. रोज नियमित चालल्याने शरीरातील ऊर्जा खर्च होते आणि दिवसाला बर्न होणाऱ्या कॅलरींची संख्या वाढण्यास मदत होते. नियमित चालण्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास, स्नायू मजबूत होण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
ज्यांनी नुकताच व्यायाम सुरू केला आहे, त्यांच्यासाठी वेगाने चालणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे सांध्यांवर जास्त ताणही येत नाही. पण फक्त रोज चालल्यानेच वजन कमी होईल असं नाही. तुम्ही किती वेळ चालता, किती वेगाने चालता, तुमचा आहार कसा आहे, झोप किती होते आणि दिवसभरात तुम्ही किती हालचाल करता यावरही वजन कमी होण्याचा परिणाम अवलंबून असतो.
काही छोट्या चुका तुमच्या वॉकिंगचा फायदा कमी करू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर या ७ गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे.
हळूहळू चालणं हे अजिबात न चालण्यापेक्षा चांगलं आहे. पण रोज खूपच संथ वेगाने चालल्यास शरीराकडून कमी ऊर्जा खर्च होऊ शकते. त्यामुळे चालताना काही वेळ थोड्या वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. वेग असा असावा की तुम्हाला बोलता येईल पण नेहमीपेक्षा श्वास थोडा जास्त लागेल.
सुरुवातीला ५ ते १० मिनिटं चालणंही चांगली सुरुवात आहे. पण वजन कमी करण्याचं लक्ष्य असेल तर हळूहळू चालण्याचा वेळ वाढवणं फायदेशीर ठरू शकतं. सुरुवातीलाच एक तास चालण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. तुमच्या क्षमतेनुसार नेहमीच्या चालण्यात दर काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी ५ ते १० मिनिटं वाढ करू शकता.
आठवड्यातून एक-दोन दिवस चालणं आणि बाकीचे दिवस काहीच हालचाल न करणं यामुळे नियमित व्यायामाचा फायदा मिळणं कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी अधूनमधून जास्त वेळ चालण्यापेक्षा नियमित चालण्याची सवय लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आठवडाभर नियमित हालचाल करण्याचा प्रयत्न करा.
काही जण रोजचा वॉक पूर्ण करतात आणि त्यानंतर संपूर्ण दिवस बसून राहतात. त्यामुळे दिवसभरातील एकूण हालचाल कमी होते. त्यामुळे फक्त वॉकिंगवर अवलंबून राहू नका. लिफ्टऐवजी शक्य असेल तेव्हा जिन्याचा वापर करा, फोनवर बोलताना थोडं चालत राहा, घरातील कामं करा किंवा कामाच्या मध्ये छोटा ब्रेक घेऊन थोडे चालून या.
वॉक केल्यानंतर काही लोकांना जास्त भूक लागते. अशावेळी चालताना जळलेल्या कॅलरींपेक्षा जास्त कॅलरी असलेलं जेवण किंवा स्नॅक्स खाल्ले तर वॉकिंगचा फायदा कमी होऊ शकतो. आपण किती कॅलरी जाळल्या याचा अंदाज अनेकदा चुकू शकतो. त्यामुळे वॉक केल्यानंतर जास्त कॅलरी असलेलं जेवण घेण्याऐवजी भाज्या, संपूर्ण धान्य, प्रोटीन असा आहार घ्या.
दररोज एकाच सपाट रस्त्यावर आणि त्याच वेगाने चालल्याने काही काळानंतर शरीराला त्या व्यायामाची सवय होऊ शकते. तुमची नेहमीची चालण्याची सवय झाली असेल तर त्यात छोटे बदल करा. थोडा चढ असलेला रस्ता निवडा, काही वेळ वेग वाढवा किंवा नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ चाला. यामुळे चालण्याचा व्यायाम शरीरासाठी थोडा अधिक आव्हानात्मक होऊ शकतो.
चालणं अगदी सोपे वाटत असलं तरी चालताना शरीराची ठेवणही महत्त्वाची आहे. चालताना डोकं वर ठेवा, खांदे सैल ठेवा आणि पाठ सरळ ठेवा. हात शरीराच्या बाजूला घट्ट ठेवण्याऐवजी ते नैसर्गिकपणे हलू द्या. तसंच पायांना योग्य आधार देणारे आणि आरामदायक शूज वापरा.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.