

आजकाल चष्म्याऐवजी अनेकजण कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. लेन्समुळे चेहऱ्यावर चष्मा दिसत नाही आणि रोजच्या कामातही सोय होते. मात्र, काही जण रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढायचे विसरतात किंवा मुद्दाम लेन्स लावूनच झोपतात. ही छोटीशी वाटणारी सवय डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.
कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपल्यानंतर लगेच त्रास होईलच असं नाही. सकाळी उठल्यावर डोळे कोरडे वाटणं, थोडी जळजळ होणं किंवा डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं वाटणं अशी साधी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.
आपल्या डोळ्यांच्या पुढच्या भागावर एक पारदर्शक थर असतो, त्याला कॉर्निया म्हणतात. या भागाला शरीराच्या इतर भागांप्रमाणे रक्तातून थेट ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे कॉर्नियाला बाहेरच्या हवेतून ऑक्सिजन मिळणं गरजेचं असतं. रात्री आपण झोपतो तेव्हा पापण्या बंद असतात. त्यामुळे डोळ्यांना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो. त्यात कॉन्टॅक्ट लेन्स लावले तर ऑक्सिजनचा पुरवठा आणखी कमी होऊ शकतो.
डोळ्यांमध्ये तयार होणारे अश्रू धूळ आणि काही जंतू दूर करण्यास मदत करतात. पण झोपताना डोळे बंद असल्यामुळे अश्रूंचा प्रसार कमी होतो. त्यात लेन्स असल्याने जंतूंना डोळ्यांवर राहण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. यामुळे डोळ्यांच्या पुढच्या भागाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या संसर्गाला मायक्रोबियल केराटायटिस असे म्हणतात. हा कॉर्नियाचा गंभीर संसर्ग असून वेळेत उपचार न केल्यास दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.
या संसर्गाचा धोका यासाठीही गंभीर आहे कारण सुरुवातीची लक्षणं खूप सामान्य असू शकतात. डोळे लाल होणं, थोडी जळजळ किंवा डोळ्यात टोचल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. अनेकजण याला डोळ्यांचा थकवा किंवा कोरडेपणा समजतात. मात्र संसर्ग वाढत असेल तर काही तासांत डोळ्यांची समस्या गंभीर होऊ शकते.
संसर्ग वाढल्यास कॉर्नियावर जखम किंवा अल्सर होऊ शकतो. यामुळे वस्तू धूसर दिसू शकतात. काही जणांना प्रकाशाकडे पाहताना त्रास होतो आणि डोळ्यात वेदनाही होऊ शकतात. वेळेत उपचार न मिळाल्यास कॉर्नियावर कायमचा परिणाम होतो. त्यामुळे दृष्टी कायमची धूसर किंवा काही वेळा विकृत होऊ शकते.
काही वेळा संसर्गामुळे कॉर्नियाला खूप मोठी इजा होऊ शकते. गंभीर परिस्थितीत कॉर्नियाला छिद्र पडू शकते किंवा संसर्ग डोळ्याच्या आतल्या भागात पसरू शकतो. अशा परिस्थितीत तातडीने उपचार घेणं गरजेचं असतं. कॉर्नियाचे नुकसान खूप जास्त झाल्यास काही रुग्णांना कॉर्निया प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
एक-दोन वेळा लेन्स लावून झोपल्यानंतर काही त्रास झाला नाही म्हणून ही सवय सुरक्षित आहे असं समजू नये. प्रत्येक वेळी संसर्ग होईलच असं नाही पण लेन्स लावून झोपल्याने संसर्गाचा धोका वाढतो. वारंवार लेन्स लावून झोपणं, ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त दिवस लेन्स वापरणं यामुळे धोका वाढू शकतो.
कॉन्टॅक्ट लेन्स काढल्यानंतरही डोळ्यांचा त्रास कमी होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. खालीलपैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
डोळे सतत लाल राहणं
डोळ्यात वेदना होणे किंवा टोचल्यासारखं वाटणं
दृष्टी धूसर किंवा धुक्यासारखी दिसणं
प्रकाश पाहताना डोळ्यांना त्रास होणं
डोळ्यातून वेगळ्या प्रकारचा चिकट पदार्थ किंवा स्त्राव येणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.