अचानक परीक्षेपूर्वी आलेला पॅनिक अटॅक हा अनुभव आज अनेक विद्यार्थ्यांना परिचित होत चालला आहे. विशेषतः असे अटॅक दहावीपर्यंत न झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर, आणि प्रामुख्याने प्रोफेशनल डिग्रीच्या टप्प्यावर जास्त प्रमाणात जाणवू लागतात. दहावीपर्यंत अनेक विद्यार्थी शालेय जीवनात केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये, खेळांमध्ये तसेच मित्र-मैत्रिणींशी संवादात सक्रिय सहभाग घेत असतात. या टप्प्यावर शाळेचे वातावरण तुलनेने सुरक्षित, परिचित आणि भावनिकदृष्ट्या आधार देणारे असते.
यावरच SMBT Group of Institutionsच्या चिकित्सक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर कविता गडदे यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. जेव्हा विद्यार्थी दहावीनंतर, विशेषतः बारावी किंवा प्रोफेशनल डिग्रीसाठी (Medical, Engineering, Law, Management इ.) मोठ्या शहरात किंवा स्पर्धात्मक वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा मानसिक स्तरावर एक मोठा बदल घडतो. इथूनच अनेक वेळा परीक्षेपूर्वी तीव्र भीती, अपयशाची सततची जाणीव, आणि “फेल होईल” हा विचार डोक्यात ठाण मांडून बसतो.
मानसशास्त्रात या अवस्थेला Performance Anxiety किंवा Test Anxiety असे म्हटले जाते. संशोधनानुसार, American Psychological Association च्या अहवालात जवळपास 20–35% विद्यार्थी परीक्षेपूर्वी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या टेस्ट अॅन्झायटीचा अनुभव घेतात. भारतात केलेल्या काही अभ्यासांनुसार प्रोफेशनल अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण 40% पर्यंत आढळते.
या अवस्थेत विद्यार्थ्याचे लक्ष अभ्यासावरून वारंवार विचलित होते. एका जागेवर बसून अभ्यास करणे कठीण वाटते. मन सतत प्रश्नांच्या गोंधळात अडकते—
हे आठवेल का?
इतर सगळे पुढे गेलेत, मीच मागे तर नाही ना?
मी प्रयत्न करूनही कमी पडतोय का?
हे सगळे विचार Cognitive Distortions म्हणजेच वास्तवाशी विसंगत नकारात्मक विचारांच्या श्रेणीत येतात—जसे Catastrophizing (सगळ्यात वाईटच होईल असे गृहीत धरणे), Overgeneralization, आणि Negative Self-Labeling. हळूहळू हे विचार रोजच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनतात.
मग प्रश्न येतो—हे सगळे फक्त अभ्यासामुळेच होते का?
उत्तर आहे: नाही.
बदलत चाललेली जीवनशैली, शिस्तबद्ध दिनक्रमाचा अभाव, झोपेची अनियमितता, सोशल मीडियावर सततची तुलना, आणि स्वतःसाठी वेळ न काढणे—हे सगळे घटक विद्यार्थीदशेत अत्यंत महत्त्वाचे असतात. पण हेच घटक दुर्लक्षित झाले की मानसिक संतुलन ढासळू लागते.
यासोबतच एक महत्त्वाचा सामाजिक-मानसिक घटक आहे. न्यूनगंड (Inferiority Complex). दहावीला चांगले मार्क्स मिळवलेले विद्यार्थी देखील बारावी आणि त्यानंतर स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घ्यायला लागतात. विशेषतः ग्रामीण किंवा लहान शहरांतून आलेले विद्यार्थी जेव्हा मोठ्या शहरांमध्ये एंट्रन्स परीक्षा किंवा शिक्षणासाठी येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये Social Comparison सुरू होते.
ही तुलना अभ्यासाच्या क्षमतेबद्दल नसते, तर—
आपण कसे दिसतो,
आपण कसे बोलतो,
आपले इंग्रजी, आपली बॉडी लँग्वेज,
आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा “कमी” आहे का—
याभोवती फिरत राहते.
मला कमी लेखतात का?”
“मी त्यांच्यासारखा प्रेझेंटेबल नाही.”
“त्यांच्या vibes वेगळ्या आहेत, मी match करत नाही.”
यानंतर एक मानसिक स्पर्धा सुरू होते—ठरलेली कामे आणि कौशल्ये विकसित करण्याऐवजी, “मी त्यांच्यासारखा कसा होऊ?” ही धडपड सुरू होते. यामुळे अभ्यास मागे पडतो, त्यातून guilt निर्माण होते, आणि परीक्षेला कमी दिवस उरलेले असताना चिंता आणि अतिविचार (Overthinking) प्रचंड वाढतो.
या सगळ्या प्रक्रियेमुळे शरीरात Stress Hormones (Cortisol, Adrenaline) सक्रिय होतात. हृदयाची धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत जडपणा जाणवतो, घाम येतो, चक्कर येते—आणि याच अवस्थेला Panic Attack असे म्हटले जाते.
DSM-5 नुसार, पॅनिक अटॅक ही शरीराची fight-or-flight response प्रणाली अतीसक्रिय झाल्यामुळे निर्माण होणारी अवस्था आहे—जी अनेकदा प्रत्यक्ष धोका नसतानाही उद्भवते.
म्हणजेच, परीक्षेपूर्वी येणारा पॅनिक अटॅक हा केवळ अभ्यासाचा प्रश्न नसून—तो ओळख, आत्ममूल्य, सामाजिक तुलना, जीवनशैली आणि मानसिक शिस्त यांच्या अभावातून तयार झालेला एक गुंतागुंतीचा मानसिक अनुभव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.