CHRONIC SPONTANEOUS URTICARIA : अंगावर उठणाऱ्या पित्ताला अॅलर्जी समजत आहात का? हे असू शकते 'क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया'

अंगावर पित्त उठले की, त्याचे कारण शोधणे अगदी स्वाभाविक असते. पण, कोणतेही स्पष्ट कारण नसताना जर हा त्रास वारंवार होत असेल, तर तो केवळ साधी अॅलर्जी नसून 'क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया' (CSU) असू शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य निदान आणि वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
CHRONIC SPONTANEOUS URTICARIA
CHRONIC SPONTANEOUS URTICARIAsaam tv
Published On: 

अंगावर पित्त उठले की, त्याचे कारण शोधणे अगदी स्वाभाविक असते. खाल्लेला एखादा अन्नपदार्थ, घेतलेले औषध किंवा त्वचेच्या संपर्कात आलेले एखादे उत्पादन यामागे असावे, असा संशय आपल्याला येतो. पण, कोणतेही स्पष्ट कारण किंवा ट्रिगर नसतानाही अंगावर वारंवार पित्त उठत राहत असेल, तर काय करावे? प्रत्येक वेळी हा त्रास केवळ अॅलर्जीमुळेच होतो आहे, असे गृहीत धरल्यास एका गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होऊ शकते.

क्रॉनिक अर्टिकारिया म्हणजे काय?

क्रॉनिक अर्टिकारिया आजारामध्ये सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंगावर सतत पित्त उठणे, सूज येणे किंवा दोन्ही त्रास वारंवार होतात. याचाच एक प्रकार म्हणजे 'क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया' (CSU). यामध्ये कोणतेही बाह्य कारण किंवा ट्रिगर नसतानाही ही लक्षणे अचानक दिसू लागतात. एखाद्या विशिष्ट घटकाशी संबंधित असणाऱ्या अॅलर्जीपेक्षा हा आजार पूर्णपणे वेगळा आहे. हा फरक वेळेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे योग्य उपचारांची दिशा ठरवता येते.

CHRONIC SPONTANEOUS URTICARIA
एकाच एक्स्टेंशन बोर्डवर मोबाईल चार्जर, Laptop, WiFi राउटर लावावं का?

ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट डर्माटोलॉजिस्ट डॉ. विशालाक्षी विश्वनाथ यांच्या म्हणण्यांनुसार, अंगावर वारंवार पित्त उठणे हे प्रत्येक वेळी अॅलर्जीचे लक्षण असेलच असे नाही. कोणतेही स्पष्ट कारण नसताना लक्षणे सतत दिसत राहतात किंवा पुन्हा पुन्हा उद्भवतात, तेव्हा त्यामागे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया हे संभाव्य कारण असू शकते. डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास या लक्षणांमागील नेमके कारण शोधून काढणे शक्य होते. विशेषतः हे पित्त झोपेत अडथळा आणू लागते, अस्वस्थता वाढवते किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते, तेव्हा वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

वारंवार उठणारे पित्त ही अॅलर्जी नसू शकते हे समजून घेण्यासाठी खालील पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी पित्त उठणे म्हणजे अॅलर्जी नसते:

अंगावर पित्त उठणे म्हणजे त्वचेवर अचानक लालसर, खाज येणारे चट्टे तयार होणे. हे अॅलर्जीमुळे होऊ शकत असले, तरी हे सीएसयूचेही प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे वारंवार अंगावर पित्त उठल्यास ते केवळ एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थ किंवा वातावरणातील घटकांमुळेच होत आहे असे मानू नये.

सहा आठवड्यांचा कालावधी महत्त्वाचा:

अंगावर पित्त उठण्याचा त्रास सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत होत असेल, तर त्याला क्रॉनिक अर्टिकारिया मानले जाते. सीएसयूमध्ये त्वचेवर उठलेले चट्टे सहसा २४ तासांच्या आत नाहीसे होतात, पण शरीराच्या दुसऱ्या भागावर नवीन चट्टे उमटू शकतात.

CHRONIC SPONTANEOUS URTICARIA
Manmad Vande Bharat : मनमाडकरांसाठी खुशखबर! आणखी एक वंदे भारत थांबणार, तिकिट किती?

कारणांचा शोध घेणे ठरू शकते निराशाजनक:

सीएसयूच्या बाबतीत शोधता येईल किंवा टाळता येईल असा कोणताही ठरावीक बाह्य घटक किंवा ट्रिगर नसतो. काही गोष्टींमुळे लक्षणे अधिक तीव्र होत असली, तरी याचा अर्थ त्या गोष्टी या समस्येचे मूळ कारण आहेत असा होत नाही. यासाठी डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेणे योग्य आहे.

प्रभाव केवळ त्वचेपुरता मर्यादित नसतो:

सततच्या खाजेमुळे झोपमोड होऊ शकते, थकवा जाणवू शकतो आणि कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. तसेच, अंगावर दिसणारे चट्टे किंवा सूज यामुळे मानसिक ताण आणि न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सीएसयू थेट जीवनशैलीच्या दर्जावर आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतो.

अचूक निदानामुळे योग्य उपचारांची दिशा ठरते:

वारंवार अंगावर पित्त उठण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. डर्माटोलॉजिस्ट किंवा अॅलर्जिस्ट लक्षणांचा कालावधी आणि वैद्यकीय इतिहास तपासून पुढील उपचारांची दिशा ठरवतात. कोणतीही स्पष्ट अॅलर्जी कारणीभूत नसते, तेव्हा केवळ संशयित घटक टाळल्याने हा त्रास थांबत नाही.

टीप : अंगावर वारंवार उठणाऱ्या पित्ताकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः ही समस्या कित्येक आठवडे टिकून राहत असेल किंवा कोणतेही कारण नसताना पुन्हा पुन्हा उद्भवत असेल, तर प्रत्येक वेळी ती साधी अॅलर्जी आहे असे समजू नका. तज्ज्ञ डर्माटोलॉजिस्टकडून योग्य तपासणी करून घेतल्यास या लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com