Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Healthy Eating Habits for Kids: मुलांचे पोट भरणे म्हणजे त्यांना योग्य पोषण मिळणे नव्हे. जंक फूड, साखरयुक्त पेये आणि पोषक घटकांची कमतरता मुलांच्या वाढीवर परिणाम करू शकते. संतुलित आहार, चांगल्या खाण्याच्या सवयी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व जाणून घ्या.
Child Nutrition
Child Nutritionsaam tv
Published On: 

एखादं मूल चिप्सचं पाकीट संपवतं, कोल्डड्रिंक पितं आणि तरीही तासाभराने पुन्हा काहीतरी खायला मागतं. तर दुसरं मूल पोटभर जेवण करूनही शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांपासून वंचित राहू शकतं. या दोन्ही गोष्टींमधून एक महत्त्वाची बाब समोर येते. ती म्हणजे, मुलाचे पोट भरणं आणि त्याच्या शरीराला योग्य पोषण मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील कंसल्टंट पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी डॉ. आदित्य कुलकर्णी म्हणाले की, अन्न आणि पोषण याविषयी चर्चा करताना केवळ अन्न उपलब्ध आहे की नाही, एवढाच विचार करून चालणार नाही. मुलांना कोणतं अन्न दिलं जातं, त्यात किती विविधता आहे आणि ते नियमितपणे पौष्टिक आहार घेतात का, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. मुलांच्या वाढीवर, ऊर्जेवर, एकाग्रतेवर आणि भविष्यातील आरोग्यावर त्यांच्या आहाराचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना पुरेसं अन्न देण्यासोबतच लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये खाण्याच्या चांगल्या सवयी निर्माण करणेही गरजेचे आहे.

Child Nutrition
Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

सोयीचे पदार्थ खाण्याची सवय ठरू शकते धोकादायक

आजकाल पॅकेटमधील स्नॅक्स, साखरयुक्त पेयं आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ मुलांना आवडतात. हे पदार्थ सहज मिळतात, परवडणारे असतात आणि चवीला आकर्षकही असतात. याशिवाय पालकांची धावपळ, शाळेतील कॅन्टीन, मोबाईल किंवा टीव्हीसमोर घालवलेला वेळ आणि जाहिराती यांमुळे मुलांच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो. त्यामुळे असे पदार्थ कधीतरी खाण्याऐवजी रोजच्या आहाराचा भाग बनू शकतात.

मुलांनी असे पदार्थ अजिबात खाऊ नयेत, असं नाही. मात्र, या पदार्थांमुळे नियमित जेवण किंवा पौष्टिक खाऊ खाण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं तर ही चिंतेची बाब ठरू शकते. जास्त साखर, मीठ किंवा आरोग्यासाठी योग्य नसलेल्या चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेली प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळवण्यासाठी कमी वाव राहतो.

मुलांच्या संतुलित आहारात विविध प्रकारच्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्यं, प्रोटीन असलेले पदार्थ आणि दूध किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश असावा. डाळी, कडधान्यं, हंगामी भाज्या, दही, अंडी आणि संपूर्ण धान्य यांसारखे नेहमीच्या आहारातील पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

केवळ वजनावरून मुलाचं पोषण ठरवू नका

बालपणीच्या कुपोषणाचा विचार करताना अनेकदा कमी वजनाकडे लक्ष दिलं जातं. मात्र पोषणाच्या समस्या केवळ कमी वजन असलेल्या मुलांमध्येच दिसतात असं नाही. एखादं मूल दिसायला चांगलं वाढलेल असलं तरी त्याच्या आहारात आवश्यक पोषक घटकांची कमतरता असू शकते. दुसरीकडे मुलाची वाढ कमी होण्यामागे इतरही कारणं असू शकतात. त्यामुळे तपासणी न करता त्यासाठी केवळ आहाराला जबाबदार धरू नये.

लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन हे मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत. रक्त तयार होणं, हाडे मजबूत होणं आणि शरीरातील ऊतींची वाढ होणं यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी त्यांची गरज असते. हे घटक पुरेशा प्रमाणात मिळाले नाहीत, तर मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेणं आणि निकृष्ट आहार खाणं यामुळे अस्वास्थ्यकर पद्धतीने वजन वाढण्याची शक्यता असते.

त्यामुळे पालकांनी केवळ मुलाचे वजन किंवा बाह्य स्वरूप पाहून समाधान मानू नये. मुलाची वाढ कशी होत आहे, त्याला पुरेशी ऊर्जा मिळते का, त्याची भूक कशी आहे आणि तो कोणते पदार्थ खातो, याकडे लक्ष द्यावं. मुलाला सतत थकवा जाणवत असेल, खाण्याच्या सवयी योग्य नसतील, वाढ कमी होत असेल किंवा आहार आणि वजनाबाबत वारंवार चिंता वाटत असेल, तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुलांना खाण्यासाठी जबरदस्ती नको, चांगल्या सवयी हव्यात

मुलं मोठ्यांचं अनुकरण करून अनेक गोष्टी शिकतात. खाण्याच्या सवयीही त्याला अपवाद नाहीत. घरातील सर्वजण एकत्र बसून वेगवेगळे पौष्टिक पदार्थ खात असतील, घरात आरोग्यदायी पदार्थ सहज उपलब्ध असतील आणि जेवणाच्या वेळा नियमित असतील, तर मुलांनाही चांगल्या सवयी लागण्यास मदत होते.

मुलांनी ताटातील प्रत्येक घास संपवावाच, असा आग्रह धरणं, गोड पदार्थांचं बक्षीस देणं किंवा काही पदार्थ खाण्यास पूर्णपणे मनाई करणं टाळावं. अशा गोष्टींमुळे जेवणाच्या वेळी तणाव निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी मुलांच्या वयानुसार योग्य प्रमाणात अन्न वाढावं. नवीन पदार्थ खाण्यासाठी मुलांना वेळ द्यावा आणि त्यांना वारंवार, पण संयमाने ते पदार्थ देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर भूक लागणं आणि पोट भरणं याचं संकेत ओळखण्यासही मुलांना मदत करावी.

Child Nutrition
Cancer symptoms in women: महिलांनो शरीरात ही 5 लक्षणं दिसली तर व्हा सावध; कॅन्सरच्या गाठीची आहेत लक्षणं

मुलांच्या आहाराच्या सवयी सुधारण्यात शाळांचीही महत्त्वाची भूमिका असते. शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, पौष्टिक अन्न आणि कॅन्टीनमध्ये आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध असणं गरजेचं आहे. पोषणाविषयी मुलांना माहिती देताना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करणं आवश्यक आहे. घरी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची उदाहरणे देऊन समजावून सांगितल्यास मुलांना पोषणाचे महत्त्व अधिक सहज समजू शकते.

प्रत्येक जेवणातून मिळवा पोषण

आपल्याला अन्नाची उपलब्धता आणि योग्य पोषण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याची आठवण करून देतो. अनेक कुटुंबांना वाढत्या अन्नधान्याच्या किमती, वेळेची कमतरता, ताजी फळं आणि भाज्या सहज उपलब्ध न होणं किंवा संतुलित आहार कसा असावा याबाबत माहिती नसणं अशा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांच्या आहाराबाबत मार्गदर्शन करताना या अडचणींचाही विचार करणे गरजेचे आहे. मुलांना योग्य आहार मिळण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ पालकांवर टाकून चालणार नाही.

Child Nutrition
Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com