

ब्लड प्रेशरची समस्या सध्या सगळ्यांमध्ये खूप कॉमन आजारासारखी झाली आहे. बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना या समस्यांना सामोरं जावं लागतं. याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात. कारण या आजारांमध्ये जेव्हा ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतं तेव्हा कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाही. मात्र शरीरात हळूहळू याचं गंभीर नुकसान होतं. यामध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा हार्टसोबत तुमच्या मेंदू, किडनी, आणि डोळ्यांवर ताण येतो. यामुळेच तुम्हाला असणारा उच्च रक्त दाबाचा त्रास ओळखता येतो.
उच्च रक्तदाबाचा सर्वात मोठा परिणाम हृदयावर होतो. रक्त पंप करण्यासाठी हार्टला नेहमीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हार्टचे मसल्स जाड होतात आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळेच हदयविकार, हार्ट फेल्युअर किंवा ह्रदयाच्या ठोक्यांवरील अनियमितता निर्माण करू शकते. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
मेंदूच्या आरोग्यासाठीही उच्च रक्तदाब अत्यंत घातक ठरतो. सतत वाढलेला दाब मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत करतो, त्यामुळे त्या फुटण्याची किंवा त्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची भिती वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. तसेच मेंदूपर्यंत जाणारा ऑक्सिजन कमी झाल्यास स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रतेत अडचण येणे आणि पुढे जाऊन डिमेन्शियासारखे विकार उद्भवू शकतो.
किडनी शरीरातली घाण गाळण्याचे महत्त्वाचे काम करतात. मात्र उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं. परिणामी किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि दीर्घकाळात क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनी फेल्युअरसारखी गंभीर अवस्था उद्भवू शकते.
डोळ्यांच्या आरोग्यावरही उच्च रक्तदाबाचा परिणाम दिसून येतो. डोळ्यातील नाजूक रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्यास दृष्टी धूसर होणे, डोळ्यांवर ताण येणे किंवा काही वेळा कायमस्वरूपी दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण होतो.
एकूणच, हाय ब्लड प्रेशर ही फक्त आकड्यांची समस्या नसून तो संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा गंभीर आजार आहे. नियमित रक्तदाब तपासणी, संतुलित आहार, तणाव नियंत्रण, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास या आजारामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणताही उपचार, औषधोपचार किंवा जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.