

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक विशेष प्रयत्न करत नाही. याचे प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा लोकांना अचानक धक्काच बसतो. तज्ज्ञ म्हणतात हाय ब्लड प्रेशर होताना अनेकांना जाणवत नाही. हा एक सायलेंट किलर मानला जातो. याची लक्षणे डॉक्टरांनी तपासल्यानंतरही जाणवत नाहीत. अशावेळेस काही हलक्या लक्षणांकडे बारकीने लक्ष देणं महत्वाचं असतं.
न्यूयॉर्कमधील एनवाययू लँगोन हेल्थचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लॉरेन्स फिलिप्स सांगतात की, बऱ्याच केसेसमध्ये हाय बीपीची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज तपासणी खूप महत्त्वाचे आहे.
हाय बीपी धोकादायक मानला जातो कारण तो हृदय, मेंदू आणि किडनीवर परिणाम करतो. उपचार न केल्याने रक्तवाहिन्या कडक होतात, पॅरेलिसिस, किडनी निकामी होणे आणि अगदी लवकर स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. रक्तदाबाचा वरचा आकडा हार्ट बीटचा दाब दाखवतो, तर खालचा आकडा हार्ट विश्रांती घेत असताना असलेला दाब दर्शवतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार 120/80 पेक्षा जास्त रक्तदाब वाढलेला मानला जातो, तर 130/80 पेक्षा जास्त असल्यास तो हाय बीपी ठरतो.
तुम्हाला जर अचानक बीपी वाढण्याचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही पुढील मार्ग निवडू शकता. हाय बीपीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न खाणे. अशा अन्नात लपलेले मीठ मोठ्या प्रमाणात असते. त्याने रक्ताचे प्रमाण वाढतं, परिणामी रक्तदाब वाढतो.
ब्रेड, सीरियल्स, चिप्स, पिझ्झा, कॅन सूप आणि रेडीमेड सॉस यांसारख्या पदार्थांमधून हे मीठ शरीरात जाते. याशिवाय असे अन्न वजन वाढवते. अतिमद्यपान हेही हाय बीपीचे एक महत्त्वाचे कारण आहे.
सतत बसून काम केल्यामुळे वजन वाढते आणि रक्तवाहिन्या कडक होतात. व्यायाम न केल्यास हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे रक्तदाब वाढतो.
तणावामुळे कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिनसारखी हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब दोन्ही वाढतात.
झोपेचा अभाव किंवा स्लीप अॅपनिया हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. झोप नीट न झाल्यास ताण वाढतो, जंक फूडची इच्छा होते आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. अनेक हाय बीपी रुग्णांना हा त्रास असतो, पण त्यांना त्याची जाणीवही नसते. जोरात घोरणे, झोपेत श्वास अडखळणे आणि दिवसभर थकवा जाणवणे ही त्याची लक्षणे आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.