

हवेतील वाढतं प्रदूषण केवळ श्वास घेण्यास त्रास देत नाही तर त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. प्रदूषित हवा, धूर आणि हवेत असलेले बारीक हानिकारक कण यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची ताकद कमी होऊन न्यूमोनियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. या आजारात एका किंवा दोन्ही फुफ्फुसांमध्ये सूज येते. काही वेळा यामध्ये द्रव किंवा पू साचतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. तसंच शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण निर्माण होते. जिवाणू आणि विषाणूंच्या संसर्गामुळे प्रामुख्याने न्यूमोनिया होतो. पण हवेतील वाढतं प्रदूषण आणि धुराच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यानेही फुफ्फुसांचं नुकसान होऊ शकतं आणि श्वसनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.
न्यूमोनिया झाल्यास सतत खोकला येणं, ताप येणं, थंडी वाजणं, छातीत दुखणं, धाप लागणं आणि खूप थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळल्यासारखं वाटणं किंवा नेहमीपेक्षा जास्त अशक्तपणा जाणवणं अशी लक्षणंही दिसतात. त्यामुळे ही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. जय भानुशाली यांनी सांगितलं की, हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. PM2.5, PM10 आणि नायट्रोजन डायऑक्साइड यांसारखे हानिकारक घटक श्वसनमार्गाला त्रास देतात. त्यामुळे श्वसनमार्गात सूज येते. तसंच विषाणू आणि जिवाणूंशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते. यामुळे न्यूमोनियासह श्वसनाच्या इतर संसर्गांचा धोका वाढतो. प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्यास फुफ्फुसं संसर्गाला लवकर बळी पडू शकतात.
पाच वर्षांखालील मुलं, ज्येष्ठ नागरिक, दमा किंवा COPD असलेले रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. सध्या हवेची गुणवत्ता खालावत असल्याने श्वसनाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.
डॉ. जय भानुशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांत न्यूमोनियाची संशयित प्रकरणं सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहेत. याच काळात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या २५ ते ६५ वर्षे वयोगटातील प्रत्येक १० रुग्णांपैकी दोन रुग्णांमध्ये सतत खोकला, ताप, छातीत दुखणं, धाप लागणं आणि खूप थकवा जाणवणं अशी लक्षणं आढळली. त्यामुळे या रुग्णांना न्यूमोनिया असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
हवेतील प्रदूषण वाढलेलं असताना शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं. बाहेर जाणं आवश्यक असल्यास मास्क वापरावा. वैयक्तिक स्वच्छता राखावी आणि फुफ्फुसांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, असा सल्ला डॉ. भानुशाली यांनी दिलाय.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. छाया वाजा यांनीही न्यूमोनियाची लक्षणं दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचं आवाहन केलंय. वेळेत तपासणी केल्यास संसर्गाचे योग्य निदान करता येतं. रुग्णाला अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधांची गरज आहे का, हेही डॉक्टर ठरवू शकतात.
श्वास घेण्यास खूप त्रास होणं, ओठ निळसर पडणं किंवा गोंधळल्यासारखं वाटणं ही गंभीर लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असं डॉ. वाजा यांनी सांगितलंय.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.