उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना घरी किंवा ऑफिसमध्ये अचानक पोटाचे त्रास जाणवू लागतात. काहींना उलट्या होतात, काहींना जुलाब होतात, तर काही जणांना पोटात क्रॅम्प्स येण्याची तक्रार जाणवते. बहुतेक लोक याचा संबंध सरळ खाण्यापिण्याशी लावतात. मात्र अनेकदा परिस्थिती वेगळी असू शकते.
केअर हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. आकाश चौधरी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ज्याला आपण फूड पॉयसनिंग म्हणतो, ते अनेकदा अनेक घटकांचं मिश्रण असते. उष्णता, अन्नपदार्थ साठवण्याची पद्धत, पाण्याची गुणवत्ता आणि वातावरण या सर्वांची यात भूमिका असते.
डॉ. चौधरींनी सांगितलं की, उष्णतेमुळे केवळ अस्वस्थ वाटत नाही, तर त्याचा थेट परिणाम अन्नाच्या सुरक्षेवरही होतो. तापमान वाढल्याने बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते. कधीकधी, अन्न दिसायला आणि वासाने अगदी ठीक वाटू शकतं, परंतु त्यातील सूक्ष्मजंतू आधीच धोकादायक पातळीपर्यंत वाढलेले असतात.
लोकांना अनेकदा असं वाटतं की, आजार केवळ अन्नामुळेच होतो, पण बऱ्याचदा खरी समस्या ही पाणी असते. पिण्याचं पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्यूसमध्ये घातलेला बर्फ किंवा नीट न धुतलेली कच्ची फळं आणि भाज्या या गोष्टी संसर्गाचे स्रोत असू शकतात. खाण्याच्या पदार्थांची आपण जितकी काळजी घेतो, तितकी पाण्याची घेत नाही आणि हा निष्काळजीपणा महागात पडू शकतो.
उन्हाळ्यात खाण्याच्या सवयीही बदलतात. बाहेर खाणं, प्रवासात खाणं किंवा रस्त्याच्या कडेला मिळणारे खाद्यपदार्थ घेणं सामान्य होतं. जर एकाच घरातील अनेक लोक एकाच वेळी आजारी पडले, तर ते एकाच खाद्यपदार्थामुळे असेलच असं नाही. कधीकधी, संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो, जो सहसा बॅक्टेरियामुळे होतो.
उन्हाळ्यात शरीरावरही वाढीव ताण येतो. डिहायड्रेशन, अनियमित जेवण आणि उच्च तापमान या सर्वांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये ही समस्या काही दिवसांत आपोआप बरी होते. जर सतत उलट्या होणं, ताप, शौचातून रक्त पडणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.