Papaya leaf tablets: केमोथेरपीनंतर प्लेटलेट्स वाढवणाऱ्या पपईच्या गोळ्या घेताय? नवीन रिपोर्ट्समुळे चिंता वाढली

Tata Memorial Hospital: केमोथेरपीमुळे कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या पानांच्या अर्काच्या गोळ्या प्रभावी असल्याचा दावा करणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संशोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Papaya leaf tablets
Papaya leaf tabletssaam tv
Published On

केमोथेरपीमुळे कमी झालेल्या प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी पपईच्या पानांच्या अर्कापासून तयार केलेल्या गोळ्या उपयोगी ठरतात, असा दावा करणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल (TMH)च्या संशोधनावर आता प्रश्न उपस्थित होताना दिसतंय. हे संशोधन काही दिवसांपूर्वी जर्नल ऑफ ग्लोबल ऑन्कोलॉजी या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं होतं. मात्र आता या संशोधनातील निष्कर्ष आणि आकडेवारीबाबत शंका उपस्थित झाल्याने जर्नलनेच त्याची चौकशी सुरू केली आहे.

कोचीमधील लिव्हर तज्ज्ञ डॉ. सायरियाक अॅबी फिलिप्स यांनी या संशोधनाची तपासणी करण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर वैद्यकीय क्षेत्रातील चुकीच्या दाव्यांना विरोध करणारे तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

या पार्श्वभूमीवर जर्नलने संशोधनाच्या ऑनलाइन प्रतीवर एक सूचना दिली आहे. त्यात या संशोधनातील निष्कर्ष पुन्हा त्याच पद्धतीने सिद्ध होऊ शकतात का आणि त्यांचा योग्य अर्थ लावला गेला आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या निष्कर्षांकडे सावधगिरीने पाहावं, असंही नमूद करण्यात आलं आहे.

Papaya leaf tablets
Sleep deprivation effects: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, ४ कारण हादरवणारं

या संशोधनात सुरुवातीला २१९ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर काही रुग्ण वगळल्यानंतर अंतिम अभ्यासासाठी १९८ रुग्णांचा डेटा वापरण्यात आला. यापैकी ६९ रुग्णांना प्लेसिबो म्हणजे औषधासारखी दिसणारी पण प्रत्यक्षात परिणाम न करणारी गोळी देण्यात आली होती.

संशोधकांनी निष्कर्षात म्हटलं आहे की, याबाबत अजून जास्त काळ अभ्यास करण्याची गरज असली तरी पपईच्या पानांच्या अर्काच्या गोळ्या केमोथेरपीमुळे कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी स्वस्त आणि उपयोगी पर्याय ठरू शकतात. त्यामुळे रुग्णांना केमोथेरपीचे नियोजित डोस वेळेवर घेणंही शक्य होऊ शकतं.

मात्र याच निष्कर्षावर डॉ. फिलिप्स यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, पपईच्या गोळ्या दिलेल्या गटात जे रुग्ण अपेक्षेप्रमाणे बरे झाले नाहीत, त्यांना अंतिम आकडेवारीतून वगळण्यात आलं.

त्यांनी सांगितलं की, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३ इतकीच कायम ठेवण्यात आली पण एकूण रुग्णांची संख्या १४६ वरून १२९ करण्यात आली. म्हणजेच जे रुग्ण बरे झाले नाहीत, तेच आकडेवारीतून काढून टाकल्यामुळे कोणताही नवीन रुग्ण बरा न होता देखील यशाचं प्रमाण सुमारे ५७ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं दिसून आलं.

'आमच्या संशोधनावर आम्हाला पूर्ण विश्वास'

या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. विकास ओस्तवाल यांनी मात्र संशोधनावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की, जर्नलकडून काही प्रश्न विचारण्यात आले असून त्यांची उत्तरं देण्याचं काम सुरू आहे. ही नेहमीची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आमच्या संशोधनावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमच्या रुग्णांना या गोळ्या दिल्यानंतर साधारण चौथ्या दिवशी त्यांच्या प्लेटलेट्समध्ये सातत्याने वाढ झाल्याचं आम्ही पाहिलं आहे.

Papaya leaf tablets
Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

या चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या पपईच्या अर्काच्या गोळ्या मायक्रो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडने उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच झायडस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आणि ल्युपिन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांनी या संशोधनासाठी आर्थिक मदत केली होती. विशेष म्हणजे ल्युपिन कंपनी 'कॅरिपापा' (Caripapa) या नावाने याच प्रकारच्या गोळ्यांची विक्री करते.

डॉ. फिलिप्स यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनाचा मुख्य आधार सुरुवातीला सातव्या दिवशी प्लेटलेट्स किती वाढतात हा होता. पण नंतर अंतिम निष्कर्ष काढताना तो बदलून चौथ्या दिवसावरील प्लेटलेट्सची वाढ हा मुख्य आधार मानण्यात आला.

वैद्यकीय संशोधनात कोणता निकाल सर्वात महत्त्वाचा मानायचा, हे संशोधन सुरू होण्यापूर्वीच ठरवलं जातं. निकाल समोर आल्यानंतर तो बदलणं वैज्ञानिकदृष्ट्या योग्य मानलं जात नाही.

Papaya leaf tablets
Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

याबाबत डॉ. फिलिप्स म्हणाले, "एखाद्या क्लिनिकल चाचणीत खूप माहिती जमा होते. निकाल पाहिल्यानंतर संशोधकांनीच कोणता निकाल महत्त्वाचा आहे हे ठरवायला सुरुवात केली, तर केवळ योगायोगाने चांगला निकाल मिळू शकतो. त्यामुळे संशोधन सुरू करण्यापूर्वीच मुख्य निकष ठरवणं खूप महत्त्वाचं असतं."

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्सचे सहसंस्थापक आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माजी नीती समिती सदस्य डॉ. अमर जेसानी यांनी सांगितलं की, वैज्ञानिक संशोधनात मतभेद असणं स्वाभाविक आहे. विज्ञानात प्रश्न विचारले जातात आणि चर्चा होते. मात्र जर संशोधन योग्य पद्धतीने झालं नसेल, तर ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलने रुग्णांची ओळख गुप्त ठेवून मूळ आकडेवारी सर्वांसमोर ठेवावी.

Papaya leaf tablets
Poor sleep consequences: रात्री उशिरा झोपूनही सकाळी लवकर जाग येते? ही 5 लक्षणं दिसली तर गंभीर असू शकतो

दरम्यान, डॉ. फिलिप्स यांनी असंही म्हटलं आहे की, एखाद्या मोठ्या आणि प्रसिद्ध संस्थेचं नाव असल्यामुळे अनेकदा संशोधनावर लगेच विश्वास ठेवला जातो. मात्र केवळ तज्ज्ञांनी तपासलं आहे म्हणून प्रत्येक संशोधनातील चुका, चुकीची आकडेवारी किंवा चुकीचे निष्कर्ष आपोआप समोर येतातच असं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com