हिंदू धर्मात पितृ पक्षाला फार महत्व आहे. या वर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षापासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. पितृ पक्षाचा काळ अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत सुरु असतो. या दिवसांत घरोघरी पितृ पक्ष करुन पूर्वजांची पूजा केली जाते. पितृ पक्ष तिथी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करतात. या काळात पितरांसाठी श्राध्द, पिंडदान, विधी केली जाते. या काळात पितरांच्या मृत्यू तिथीचे श्राध्द केल्याने वर्षभर सुख-समृध्दी राहते.
पितृ पक्षाचे हे दिवस फार महत्वाचे असल्याने,या दिवशी पितरांना तिथीनुसार घरी बोलवून वेगवेगळा नैवेद्य दिला जातो. या दिवशी सर्व पदार्थ पूर्वजांच्या आवडीप्रमाणे बनवले जातात. पितृ पक्षात मृत पूर्वज पृथ्वीवर येतात असे मानले जाते. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपण चुकीच्या पद्धतीने केलेल्या विधींना माफ करतात. या पितृ पक्षात कोणाला पितृ दोष असेल, तर त्या मुक्तीसाठी हे श्राध्द खूप महत्वाचे आहे. या श्राध्दात अन्नदान करण्याची ही परंपरा आहे. या दिवशी कावळ्याला विशेष महत्तव असल्याने त्याला अन्नदान केले जाते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, या दिवशी कावळ्याला अन्नदान करण्याचे काय महत्व आहे?
पितृ पक्षाच्या तिथीत कावळे पूर्वजांच्या रुपात येतात. या दिवशी कावळे वंशजाकडून अन्न आणि पूजा -विधीचा स्वीकार करतात. पितृ पक्षाच्या या काळात कोणत्याही पूर्वजांचा आत्मा कावळ्याच्या शरीरात असतो. हिंदू धर्मात पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना पूर्वज मानतात. शास्त्रानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मरते, तेव्हा ती व्यक्ती कावळ्याच्या पोटी जन्म घेते. या दिवशी जर,कावळा तुम्ही दिलेले अन्न खात असेल तर ते खूप शुभ मानले जाते.
कथेनुसार असे म्हणतात की, इंद्रदेवाच्या मुलाने कावळ्याचे रुप घेतले होते. रामजींनी कावळ्याच्या एका डोळ्यात पेंढा घातला होता त्याचवेळी कावळ्याने श्रीरामाची माफी मागितली होती. त्या माफीनंतर भगवान रामाने कावळ्याला दिले जाणारे अन्न पितरांना देण्यात येईल असा आशीर्वाद दिला.
पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना भविष्यातील घडणाऱ्या गोष्टींची कल्पना असते. म्हणून पितृ पक्षाच्या दिवशी कावळ्यांना विशेष महत्व असते.पितृ पक्षाच्या दिवसांत गाय, कुत्रा, मुंग्या यांनाही अन्नदान केले जाते. या दिवसांत मुक्या प्राण्यांना अन्न दिल्याने पितरांच्या मनाला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Edited By: Sakshi Jadhav