
दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक संधिवात दिवस' पाळला जातो. बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढताना दिसतेय. वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रिया यांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना एक्टिव्ह जीवन जगता ठेवण्यास येतं.
संधिवात हा आता केवळ वयोवृध्दांपुरता मर्यादित नसून २० ते ५० वयेगटातील व्यक्तींमध्येही संधिवाताचं निदान होतंय आणि रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. बरेच तरुण रुग्ण सांध्यांमधील कडकपणा किंवा सूज येणं यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परंतु भविष्यात त्यांना दीर्घकालीन वेदनांचा सामना करावा लागतो.
ऑस्टियोआर्थरायटिस (सांध्यांची झीज) आणि संधिवात (एक ऑटोइम्यून डिसऑर्डर जिथे शरीर स्वतःच्या सांध्यावर हल्ला करते) असे अनेक संधीवाताचे प्रकार आहेत.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित ग्रोव्हर म्हणाले की, सध्या २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये ४०% वाढ झाली आहे. दर महिन्याला ओपीडीमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या १० पैकी ४ व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसुन राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पध्दत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात.
डॉ. अमित ग्रोव्हर पुढे म्हणाले की, सांधे कडक होणं, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणं आणि थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणं आणि तणावाचं व्यवस्थापन करणं हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात.
झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव म्हणाले की, बरेच तरुण सांध्यामधील कडकपणा किंवा वेदनेकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही संधिवाताची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. २०-४० वयोगटातील तरुणांमध्ये संधिवाताच्या प्रकरणांमध्ये २०% वाढ झाली आहे. महिन्याभरात १० पैकी २ व्यक्ती सांधेदुखी आणि स्नायूंचा कडकपणा यांसारख्या समस्या घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतात.
लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते. वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधं आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणं, तणावाचं व्यवस्थापन करणं आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नये, असंही श्रीसनत राव यांनी सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.