

भारतामध्ये ओरल कॅन्सर हा सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. यामागे मुख्य कारण म्हणजे तंबाखू, गुटखा आणि सुपारी यांचं मोठ्या प्रमाणावर होणारं सेवन. आजपर्यंत या आजारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी यांसारखे उपचार वापरले जातात. मात्र या उपचारांमध्ये केवळ कॅन्सर पेशीच नाही तर आजूबाजूच्या निरोगी पेशींनाही इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांना अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतात. अशा परिस्थितीत एका नवीन संशोधनाने उपचारांच्या दृष्टीने नवी आशा निर्माण केली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील वैज्ञानिकांनी केलेल्या नव्या अभ्यासात असं दिसून आलंय की, कमी फ्रिक्वेन्सी (low-frequency) असलेल्या अल्ट्रासाउंडचा वापर करून ओरल कॅन्सरच्या पेशींना टार्गेट करता येऊ शकतं. या पद्धतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच्या निरोगी पेशींवर फारच कमी परिणाम होतो. जर पुढील संशोधनातही असेच सकारात्मक परिणाम मिळाले तर भविष्यात ही पद्धत ओरल कॅन्सरच्या उपचारासाठी अधिक सुरक्षित आणि कमी दुष्परिणाम असलेला पर्याय ठरू शकते.
या संशोधनात वैज्ञानिकांनी एम. एस. रामय्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मदतीने थेट रुग्णांकडून घेतलेल्या ओरल ट्यूमरच्या नमुन्यांवर प्रयोग केले. लॅबमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या कॅन्सर पेशींऐवजी प्रत्यक्ष रुग्णांचे नमुने वापरल्यामुळे निष्कर्ष अधिक अचूक मिळाले.
अभ्यासात असं आढळलं की, ओरल कॅन्सरच्या पेशी अल्ट्रासाउंडमुळे निर्माण होणारा हलका mechanical दबाव सहन करू शकत नाहीत. यामागे ट्रोपोमायोसिन 2.1 नावाच्या प्रोटीनचं कमी प्रमाण हे एक कारण मानलं जातं. हे प्रोटीन सामान्य पेशींना बाहेरून येणारा दबाव ओळखून त्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. मात्र कॅन्सर पेशींमध्ये हे प्रोटीन कमी असल्यामुळे त्या अल्ट्रासाउंडच्या प्रभावाखाली लवकर नष्ट होतात. याउलट निरोगी पेशींवर याचा परिणाम खूपच कमी दिसतो.
या संशोधनात असेही दिसून आले की अल्ट्रासाउंड केवळ कॅन्सर पेशींना नष्ट करत नाही, तर त्यांच्या वाढण्याची आणि शरीरात पसरायची क्षमता देखील कमी करते. याशिवाय ट्यूमरच्या आजूबाजूला असलेले संरक्षणात्मक आवरण कमकुवत करण्यासही ही पद्धत मदत करू शकते.
हे आवरण अनेकदा औषधं आणि शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरपर्यंत पोहोचू देत नाही. ते कमकुवत झाल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात.
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, अल्ट्रासाउंड ही आधीपासूनच वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षित आणि कमी त्रासदायक (non-invasive) तंत्र म्हणून वापरली जाते. त्यामुळे जर पुढील प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांमध्येही असंच सकारात्मक परिणाम मिळाले तर ही पद्धत ओरल कॅन्सरसह ब्रेस्ट कॅन्सर आणि स्किन कॅन्सर सारख्या इतर कॅन्सरमध्येही उपयुक्त ठरू शकते. सध्या हे संशोधन प्राथमिक टप्प्यात आहे. याला नियमित उपचार पद्धती म्हणून स्वीकारण्यापूर्वी अजून अनेक चाचण्या आणि अभ्यास आवश्यक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.