

ब्रिटनमधील 35 वर्षीय लुसी थॉमसला तिच्या हाताच्या नखाखाली दिसणारी काळी रेघ सुरुवातीला काही गंभीर वाटली नाही. ती नियमितपणे नेल एक्स्टेन्शन आणि अॅक्रिलिक नेल्स लावत असल्याने हा बदल नखाच्या सौंदर्यप्रसाधनांमुळे झाला असावा, असं तिला वाटलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला subungual melanoma या दुर्मिळ पण गंभीर त्वचेच्या कॅन्सरचं निदान केलं.
या अनुभवानंतर लुसीने जगभरातील महिलांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. नेल एक्स्टेन्शन किंवा फेक नेल्स सतत लावून ठेवू नका. अधूनमधून ते काढून स्वतःच्या नखांची नीट तपासणी करा. कारण छोटासा डाग किंवा काळी रेघही कधी गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्याही मते हा कॅन्सर दुर्मिळ असला तरी वेळेत ओळखला गेला नाही, तर तो जीवघेणा ठरू शकतो.
सबअंग्वल मेलानोमा म्हणजे नखाखाली होणारा त्वचेचा कॅन्सर. हा कॅन्सर नखाच्या मुळाशी असलेल्या नेल मॅट्रिक्समध्ये तयार होतो. याच भागातून नख वाढतं. या भागात मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशी असतात. या पेशी मेलॅनिन तयार करतात, ज्यामुळे त्वचा आणि नखांना रंग मिळतो. जेव्हा या पेशींमध्ये कॅन्सरची वाढ सुरू होते तेव्हा नखाखाली काळी किंवा तपकिरी उभी रेघ दिसू लागते.
हा कॅन्सर बहुतेक वेळा पायाच्या अंगठ्याच्या नखात, हाताच्या अंगठ्याच्या नखात किंवा तर्जनीच्या नखात आढळतो. विशेष म्हणजे हा कॅन्सर इतर त्वचेच्या कॅन्सरप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे होत नाही.
अनेकदा लोक नखाचा रंग बदलल्यावर तो मार लागल्यामुळे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे झाला असं समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कॅन्सरचं निदान उशिरा होतं. मात्र सुरुवातीलाच तो ओळखला गेला, तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते.
subungual melanoma मध्ये सुरुवातीला नखाखाली काळी किंवा तपकिरी उभी रेघ दिसते. कालांतराने ही रेघ अधिक रुंद आणि गडद होऊ शकते.
नख तुटणं
नखाभोवती सूज येणं
नखाखाली गाठ, जखम किंवा रक्तस्राव होणं
नखाभोवतीच्या त्वचेचाही रंग काळसर होणं
काही रुग्णांमध्ये काळी रेघ दिसत नाही. त्यामुळे नखात कोणताही वेगळा किंवा संशयास्पद बदल दिसल्यास तो दुर्लक्ष करू नये.
तज्ज्ञांच्या मते, नेल एक्स्टेन्शन किंवा अॅक्रिलिक नेल्समुळे हा कॅन्सर होतो, असं सिद्ध झालेलं नाही. मात्र फेक नेल्समुळे नखाखाली होणारे बदल लपून राहू शकतात. त्यामुळे नियमितपणे फेक नेल्स काढून स्वतःच्या नखांची तपासणी करणं आवश्यक आहे. नखावर काळी रेघ, डाग, रंगातील बदल किंवा कोणतंही असामान्य लक्षण दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला तातडीने घ्यावा. वेळेत निदान झाल्यास या दुर्मिळ कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य आहेत.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.