

पुरुषांसाठी तयार केली जातेय गर्भनिरोधक गोळी
गर्भधारणा रोखण्यासाठी ही गोळी करेल काम
संभोगाच्या ३० मिनिटे आधी घेता येणारी ही गोळी
पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीचे संशोधन शेवटच्या टप्प्यात
गर्भधारणा टाळण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या खातात. अशाच प्रकारच्या गोळ्या आता पुरूषांसाठी देखील उपलब्ध असणार आहे. सध्या शास्त्रज्ञ पुरूषांसाठी एका गर्भनिरोधक गोळीवर काम करत आहेत. ही गोळी संभोगाच्या ३० मिनिटं आधी खाता येईल. ही गोळी शुक्राणूची हालचाल तात्पुरती रोखू शकते. ज्यामुळे महिलांना गर्भधारणेचा धोका कमी होतो. ही गोळी अद्याप मार्केटमध्ये आली नाही. या गोळीवर सध्या संशोधन सुरू असून हे संशोधन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.
एबीपी न्यूजला गुरूग्राम येथील सी. के बिर्ला रुग्णालयामध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या शैक्षणिक संचालिका आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. अरुणा कालरा यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पुरूषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुरूषांसाठीच्या या गर्भनिरोधक गोळीचा पर्याय दोन्ही जोडीदारांमध्ये गर्भनिरोधकाची जबाबदारी वाटून घेण्याच्या पद्धतीमध्ये एक महत्वाचा बदल घडवून आणू शकतो. पण या गोळीचा वापर करण्यापूर्वी त्याची सुरक्षितता, ते घेतल्यानंतर होणारे परिणाम आणि त्याचे काही दीर्घकाळ परिणाम होतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेतील वेल कॉर्नेल मेडिसन येथील शास्त्रज्ञ हार्मोन्समध्ये बदल करण्याऐवजी थेट शुक्राणूंच्या हालचालींवर परिणाम करणाऱ्या पुरूषांच्या गर्भनिरोधक गोळीवर सध्या काम करत आहेत. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी शरीरातील सोल्युबल अॅडेनायलेट सायक्लेज नावाच्या एका विशिष्ट एन्झाइमवर लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्राणूंना पुढे जाऊन अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी या एन्झाइमची आवश्यकता असते. गर्भनिरोधक गोळी या एन्झाइमला तात्पुरते अवरोधित करून काम करते. यामुळे शुक्राणूंना सामान्यपणे हालचाल करण्यापासून थांबवले जाते. त्यामुळे शुक्राणूंची अंड्यापर्यंत पोहचण्याची क्षमता कमी होते आणि गर्भधारणेचा धोका टळतो.
पुरूषांसाठी तयार करण्यात येत असलेल्या या गर्भनिरोधक गोळीच्या वापराबाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे. या गोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या वापराची पद्धत आहे. शास्त्रज्ञ तयार करत असलेली ही गर्भनिरोधक गोळी पुरूषांना संभोगाच्या अर्धातास आधी घेता येईल. ही गोळी खाल्ल्यानंतर त्याचा प्रभाव ६ ते ८ तास टिकतो असे संशोधनात दिसून आले. जर भविष्यामध्ये हे औषध मानवांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले तर ते दररोज घेण्याची गरज भासणार नाही. त्याचा वापर गरजेनुसार केला जाऊ शकतो. हे सर्व प्राथमिक संशोधनावरून सांगितले जात आहे. पण मानवांवरील त्याच्या प्रभावाचा कालावधी फक्त क्लिनिकल चाचण्यांनंतर स्पष्ट होणार आहे.
ही गोळी खाल्ल्यानंतर शुक्राणूंची निर्मिती थांबेल का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण ही गोळी खाल्ल्याने पुरूषांमधील शुक्राणूंची निर्मिती थांबत नाही. या गोळीचा मुख्य उद्देश शुक्राणूंची हालचाल तात्पुरती रोखणे किंवा कमी करणे हा आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर पुरूषांच्या शरीरामध्ये शुक्राणूचे उत्पादन सुरू राहू शकते. पण जोपर्यंत औषधाचा प्रभाव आहे तोपर्यंत शुक्राणूच्या हालचाल करण्याच्या क्षमेतेवर परिणाम होऊ शकतो.
या औषधाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शुक्राणूंची सामान्य हालचाल परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच औषधाचा प्रभाव कमी झाल्यावर पुरूषांची प्रजनन क्षमता सामान्य होते की नाही हे शास्त्रज्ञांसाठी निश्चत करणे खूप महत्वाचे राहिल. पुरुषांसाठीची ही गर्भनिरोधक गोळी फक्त गर्भधारणा टाळण्यासाठी तयार केली जात आहे. ती लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण देणार नाही. संसर्ग टाळण्यासाठी कंडोमचा वापर आवश्यक असेल असे डॉक्टर म्हणाल्या. सध्या ही गोळी संशोधन आणि प्रायोगिक टप्प्यात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.