

आपण श्वास घेतो त्यावेळी शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन फुफ्फुसांमधून मिळतो. त्यामुळे फुफ्फुसं शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. विशेष म्हणजे फुफ्फुसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते. श्वासासोबत शरीरात जाणारी धूळ, प्रदूषणातील सूक्ष्म कण आणि जंतू अडकवण्यासाठी फुफ्फुसं चिकट द्रव म्हणजेच म्युकस तयार करतात.
फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी धूम्रपान टाळणं, सिगारेटच्या धुरापासून दूर राहणं, वायू प्रदूषण आणि इतर त्रासदायक धुराचा संपर्क कमी ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा सवयींमुळे फुफ्फुसांवरील ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि कालांतराने फुफ्फुसं स्वतःची दुरुस्तीही करू शकतात.
ग्रीन टी प्यायल्याने फुफ्फुसं स्वच्छ होतात किंवा त्यांचं डिटॉक्स होतं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मात्र ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. हा ताण जास्त वाढल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
ScienceDirect मध्ये प्रकाशित झालेल्या दक्षिण कोरियातील १,००० हून अधिक प्रौढांवरील अभ्यासात असं आढळलं की, जे लोक दररोज किमान दोन कप ग्रीन टी पित होते, त्यांची फुफ्फुसांची कार्यक्षमता इतरांच्या तुलनेत अधिक चांगली होती.
खोकला हा शरीराचा नैसर्गिक संरक्षणाचा मार्ग आहे. त्याद्वारे फुफ्फुसांमध्ये अडकलेला कफ आणि घातक कण बाहेर टाकले जातात. पण काही लोकांना कफ सहज बाहेर पडत नाही किंवा सतत छातीत कफ साचल्यासारखं वाटतं. अशा वेळी 'कंट्रोल्ड कफिंग' हा उपाय उपयोगी ठरू शकतो.
यासाठी आरामात खुर्चीवर बसा. खांदे सैल ठेवा आणि दोन्ही पाय जमिनीवर टेकवा. आता नाकातून हळूहळू खोल श्वास घ्या. काही क्षण श्वास रोखून ठेवा. त्यानंतर सलग दोन-तीन वेळा थोडा जोर देऊन खोकला. ही प्रक्रिया काही वेळा केल्याने फुफ्फुसांच्या आत खोलवर असलेला कफ वर येण्यास मदत होते आणि तो सहज बाहेर पडतो.
पोस्टरल ड्रेनेज ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने फुफ्फुसांमधील कफ बाहेर येण्यास मदत केली जाते. शरीराची विशिष्ट स्थिती ठेवल्यास फुफ्फुसांच्या वेगवेगळ्या भागांतील कफ मोठ्या श्वसनमार्गाकडे सरकतो.
जसं की, पाठीवर झोपून कंबरेखाली उशी ठेवली तर छाती कंबरेपेक्षा खाली राहते. त्यामुळे कफ खाली सरकून बाहेर पडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एका कुशीवर किंवा पोटावर झोपतानाही कंबरेखाली आधार दिल्यास काही भागांतील कफ हलण्यास मदत मिळू शकते. या प्रक्रियेदरम्यान छातीवर हलक्या हाताने थाप देणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे घट्ट चिकटलेला कफ सैल होतो.
गरम पाण्याच्या वाफेचा श्वास घेतल्याने अनेकांना सर्दी, कफ किंवा नाक बंद झाल्यावर आराम मिळतो. वाफेमुळे श्वसनमार्गातील कफ पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे खोकल्याद्वारे तो बाहेर काढणं सोपं होतं. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) सारख्या काही श्वसनविकारांमध्येही काही रुग्णांना वाफेमुळे श्वास घेणं थोडं सोपं वाटू शकतं.
वाफ घेताना पाणी खूप गरम नसावं, अन्यथा भाजण्याचा धोका असतो. तसंच ज्यांना आधीपासून गंभीर फुफ्फुसांचे आजार आहेत, त्यांनी नियमितपणे हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
चेस्ट पर्कशन ही एक विशेष पद्धत आहे. यामध्ये प्रशिक्षित आरोग्यतज्ज्ञ किंवा रेस्पिरेटरी थेरपिस्ट हाताचा कपसारखा आकार करून छातीवर विशिष्ट पद्धतीने हलक्या थापा देतात. या थापांमुळे फुफ्फुसांच्या आत खोलवर साचलेला कफ सैल होतो आणि मोठ्या श्वसनमार्गाकडे सरकतो. त्यामुळे तो खोकल्याद्वारे बाहेर काढणं सोपं होतं.
ही पद्धत पोस्टरल ड्रेनेजसोबत केल्यास अधिक चांगला परिणाम दिसू शकतो. विशेषतः ज्यांना सतत कफ साचतो किंवा श्वसनाचे दीर्घकालीन आजार आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.