

आजकालच्या जीवनशैलीमुळे हाय ब्लड प्रेशर ही समस्या केवळ वयोवृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतात आता 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्येही रक्तदाब वाढण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. तणावपूर्ण जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ही समस्या झपाट्याने वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
कार्डिओलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉ. अमित कुमार पांडे यांच्या मते, गेल्या काही वर्षांत लोकांच्या राहणीमानात मोठे बदल झाले आहेत. याच बदलांचा थेट परिणाम रक्तदाबाच्या समस्यांवर होतोय.
उच्च रक्तदाब वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आहारातील मीठाचं वाढलेलं प्रमाण. बाजारात मिळणारे पॅकेज्ड स्नॅक्स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि हॉटेलमधील अनेक खाद्यपदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. अशा पदार्थांचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब हळूहळू वाढू शकतो.
डॉ. पांडे सांगतात की, जास्त मीठ खाण्याबरोबरच व्यायामाचा अभाव, वाढतं वजन, धूम्रपान, मद्यपान, अपुरी झोप आणि दीर्घकाळ कामाचा ताण यामुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
ज्यांना आधीपासून रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी उन्हाळ्याचा सिझन काहीसा कठीण ठरू शकतो. तीव्र उष्णता आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन बिघडू शकतं. याचा परिणाम रक्तदाबावर होण्याची शक्यता असते.
रक्तदाबाची पातळी व्यक्तीच्या आरोग्याचे महत्त्वाचे संकेत देते. सामान्य रक्तदाब 120/80 mmHg पेक्षा कमी मानला जातो. जर सिस्टोलिक रक्तदाब 120 ते 129 mmHg दरम्यान असेल आणि डायस्टोलिक रक्तदाब 80 mmHg पेक्षा कमी असेल, तर तो वाढलेल्या रक्तदाबाच्या श्रेणीत मोडतो.
सिस्टोलिक रक्तदाब 130 ते 139 mmHg आणि डायस्टोलिक 80 ते 89 mmHg दरम्यान असल्यास त्याला स्टेज 1 हायपरटेन्शन म्हटलं जातं.
सिस्टोलिक रक्तदाब 140 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त आणि डायस्टोलिक 90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो स्टेज 2 हायपरटेन्शन मानला जातो.
सिस्टोलिक रक्तदाब 180 mmHg पेक्षा जास्त आणि डायस्टोलिक 120 mmHg पेक्षा जास्त झाल्यास ती हायपरटेन्सिव्ह क्रायसिसची गंभीर अवस्था समजली जाते.
जरी सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नसली तरी काही संकेत गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. वारंवार डोकेदुखी होणे, चक्कर येणे, छातीत अस्वस्थता जाणवणं, दृष्टी धूसर होणं, नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही रक्तदाब वाढल्याची संभाव्य लक्षणं असू शकतात.
ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हार्ट अटॅकचा इतिहास आहे अशा लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. स्वतःला कोणताही त्रास नसला तरी नियमितपणे रक्तदाब तपासून घेणे फायदेशीर ठरते.
तज्ज्ञांच्या मते, काही साधे बदल करून उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. आहारातील मीठ कमी करणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं, तणाव नियंत्रणात ठेवणं आणि भरपूर पाणी पिणं या सवयींमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अधिक सोपं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.