Children’s eye health: मुलांच्या डोळ्यांवर स्क्रीनचा वाढता ताण! पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं

Screen time and eye health: मोबाईल, लॅपटॉप आणि ऑनलाइन वर्गांमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे, मायोपियाचा धोका, २०-२०-२० नियम, मैदानी खेळ आणि नियमित नेत्रतपासणी यांद्वारे मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.
Children’s eye health
Children’s eye healthsaam tv
Published On: 

आजकाल मुलांच्या दिवसाची सुरुवात ऑनलाइन वर्गाने होते. त्यानंतर लॅपटॉपवर होमवर्क केला जातो आणि दिवसाचा शेवट मोबाईलवर गेम खेळण्यात किंवा व्हिडिओ पाहण्यात होतो. त्यामुळे स्क्रीन हा मुलांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पालक मुलं काय पाहतात, किती खेळतात आणि वेळेवर झोपतात की नाही, याकडे लक्ष देतात. मात्र, या सगळ्यात मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.

मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांचा वाढता वापर, तसंच बराच वेळ जवळून स्क्रीन पाहण्याची सवय यांचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान वयापासूनच डोळ्यांची काळजी घेण्याच्या चांगल्या सवयी मुलांना लावणं गरजेचं आहे.

Children’s eye health
Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर काय परिणाम होतो?

ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्समधील मोतीबिंदू आणि दृष्टिदोष सुधारणा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रोहन देढिया यांनी सांगितलं की, बराच वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. याला 'डिजिटल आय स्ट्रेन' असं म्हणतात. स्क्रीनकडे सतत पाहिल्यानंतर मुलांचे डोळे थकू शकतात. डोळ्यांत कोरडेपणा जाणवणं, जळजळ किंवा चुरचुर होणं, डोकेदुखी, अंधुक दिसणं आणि एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं अशा समस्या उद्भवू शकतात.

मोबाईल किंवा लॅपटॉपवरील मजकूर वाचताना आणि व्हिडिओ पाहताना मुलं अनेकदा कमी वेळा पापण्यांची उघडझाप करतात. त्यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो आणि डोळ्यांना कोरडेपणा जाणवू शकतो. याशिवाय मुलांमध्ये 'मायोपिया' म्हणजेच जवळचा दृष्टिदोष होण्याचीही चिंता आहे. या समस्येत जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. बालपणातील कोणत्याही टप्प्यावर हा दृष्टिदोष होऊ शकतो.

बराच वेळ जवळून स्क्रीन पाहणं आणि घराबाहेर कमी वेळ घालवणं या सवयींमुळे मायोपिया होण्याची शक्यता वाढू शकते. तसंच आधीपासून असलेल्या दृष्टिदोषाची तीव्रताही वाढू शकते, असं संशोधनातून समोर आलंय.

डोळ्यांवरील ताण वाढण्याची कारणं काय?

डोळ्यांवर ताण येण्यामागे केवळ स्क्रीनचा वापर हेच कारण नसतं. मुलं स्क्रीनचा वापर कशा प्रकारे करतात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एखादी वस्तू बराच वेळ जवळून पाहणं, खोलीत पुरेसा प्रकाश नसणं, अयोग्य प्रकाशात स्क्रीन वापरणं, स्क्रीनचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडणं आणि डोळ्यांना पुरेशी विश्रांती न मिळणं यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.

दुसरीकडे आजकाल मुलं घराबाहेर कमी वेळ घालवत आहेत. मैदानी खेळांपेक्षा मोबाईलवरील गेम, व्हिडिओ आणि घरातील इतर उपक्रमांकडे त्यांचा कल वाढत आहे. मात्र घराबाहेर अधिक वेळ घालवल्याने मुलांमध्ये मायोपिया होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुलांनी दररोज काही वेळ मैदानी खेळ खेळणं आणि बाहेर फिरणं गरजेचं आहे.

मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करावं?

मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, स्क्रीन वापरण्याच्या योग्य सवयी लावणं महत्त्वाचं आहे.

२०-२०-२० नियमाचा वापर करा

मुलं सलग बराच वेळ स्क्रीन पाहत असतील तर त्यांना मध्येच विश्रांती घेण्याची सवय लावा. यासाठी २०-२०-२० हा नियम उपयोगी ठरू शकतो. या नियमानुसार, सलग २० मिनिटं स्क्रीन पाहिल्यानंतर किमान २० सेकंदांसाठी २० फूट अंतरावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहावं. यामुळे जवळच्या वस्तूंकडे सतत पाहण्यापासून डोळ्यांना थोडी विश्रांती मिळते.

Children’s eye health
Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

स्क्रीन योग्य अंतरावर ठेवा

मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर डिजिटल उपकरणं डोळ्यांपासून योग्य आणि आरामदायी अंतरावर ठेवून वापरावीत. स्क्रीन वापरताना खोलीत पुरेसा प्रकाश असावा. तसंच स्क्रीनवरून डोळ्यांवर पडणारा प्रखर प्रकाश शक्य तितका कमी ठेवावा.

घराबाहेर खेळण्यासाठी वेळ द्या

मुलांनी दिवसभर घरात बसून मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्याऐवजी काही वेळ घराबाहेर घालवावा. त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी आणि बाहेर फिरण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. घराबाहेर वेळ घालवण्याची सवय डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

नियमित डोळ्यांची तपासणी करा

मुलांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करणंही महत्त्वाचं आहे. एखादं मूल वारंवार डोळे बारीक करून पाहत असेल, स्क्रीनच्या अगदी जवळ बसत असेल किंवा सतत डोकेदुखीची तक्रार करत असेल, तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Children’s eye health
Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावा

आजच्या काळात मुलांना मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांपासून पूर्णपणे दूर ठेवणं शक्य नाही. त्यामुळे स्क्रीनचा वापर आणि इतर दैनंदिन उपक्रम यांच्यात योग्य संतुलन राखणं गरजेचं आहे.

मुलांना मैदानी खेळांसाठी वेळ देणं, स्क्रीन वापरताना मध्येच विश्रांती घेण्याची सवय लावणं आणि नियमित नेत्रतपासणी करणं, या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. लहान वयातच अशा चांगल्या सवयी लावल्यास मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com