ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड आहे. गोरखगडला 'गोरक्षगड' असेही म्हणतात. श्री गोरखनाथ यांच्या नावावरून 'गोरखगड' असे नाव ठेवण्यात आले. गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात आणि कमी खर्चात करता येण्यासारखारखा ट्रेक आहे.
गोरखगड ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात रोमांचक ट्रेकपैंकी एक आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या दृष्यांसाठी हा ट्रेक प्रसिद्ध आहे.अतिशय धोकदायक असलेल्या या गडाचा ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख नाही. मात्र गडावरील खोदीव गुहा, पाण्याची टाकी, खडकाळ पायऱ्या आणि इतर अवशेषांवरून हा गड एकेकाळी घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी असावा, असे म्हटले जाते. आजच्या लेखात आपण याच गडाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
१) गोरखगडावर बघण्यासारखे काय आहे?
गोरखगडाचा ट्रेक(Trek) शिखरावर पोहोचल्याशिवाय पूर्ण होत नाही. मात्र शिखरावर फार कमी लोक पोहचू शकतात. गडावर गेल्यावर शिखराजवळ एक शंकराचे मंदिर लागते. या मंदिराच्यावर जाण्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव पाहिजे. कारण मंदिराच्यावर जाण्यासाठी प्रचंड वेगाने येणारा वारा आणि खडकाळ पायऱ्या आहेत.
गडाच्या माथ्यावरून सिद्धगड आणि मच्छिंद्रगडापासून नाणेघाट परिसरातील जीवधनपर्यंतचा पूर्ण नजरा दिसतो.
गडाच्या पायथ्याशी एक मोठा वट वृक्ष आहे. त्याखाली नाथपंथीयांच्या काही ऐतहासिक समाध्या आहेत.
ओबडधोबड पायवाटेने अर्धातास चढल्यावर गडाचा पहिला टप्पा येतो. तिकडे गोरखनाथांची प्राचीन गुफा (Cave)आहे. या गुफेत नाथपंथीय साधुंच्या मुर्ती आहेत. त्यांनतर कातळात कोरलेल्या पायर्यांवरुन पुढे गेल्यास एक मोठी गुहा कोरलेली आहे.
गोरखगडावर एकूण ५ ते ६ पाण्याची टाके आहेत. मात्र त्यापैकी एकाच गुहेजवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
२) गडावर जायचे कसे?
मुंबईकरांनी ठाणे रेल्वेस्थानकावरून कल्याणसाठी लोकल पकडा. कल्याण स्टेशनला उतरून मुरबाडला जाण्यासाठी बस पकडा. त्यानंतर मुरबाडवरून खासगी किंवा शेअरिंग रिक्षा गोरखगडाच्या पायथ्याजवळ सोडतात. नवीन ट्रेकर असल्यास दोन तासात हा ट्रेक पूर्ण होईल. अनुभवी ट्रेकरला साधरणपणे तासभर लागेल.
पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून धसई गावात यावे. त्यानंतर खासगी जीप अथवा बस सेवा उपलब्ध आहे. त्यानंतर देहरी गावातून विठ्ठलाच्या मंदिराजवळून जंगलात जाणारी एक पायवाट आहे. साधारणपणे एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी ही वाट घेऊन जाते. या वाटेने गड (Fort)चढण्यास दोन तास लागतात.
मुरबाड तालुक्यातील मिल्हे मार्गाने देहरी गावी यावे. या गावातून खूप सोप्या वाटेने गडावर जाता येते.
गोरखगडावर जाण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड - नारिवली मार्गाने यावे. हा मार्ग कठीण असण्याने या मार्गाने गड चढण्यास तीन तास लागतात.
३) गडावर खाण्याची, राहण्याची सोय आहे का?
गोरखगडावर खाण्याची कसलीही सोय नाही. तसेच राहण्यासाठी सुद्धा तंबू ठोकता येत नाही. मात्र गडावर असलेल्या गुफेत तुम्ही राहू शकता. साधारणपणे १५ जण या गुफेत राहू शकतात. त्यामुळे खाण्यासाठी आणि पाणी सोबत ठेवाच. अन्यथा गावात येण्याआधीच पोट भर खाऊन घ्या.
४) गोरखगडावर कधी जावे?
गोरखगडावर पावसात(Monsoon) जाणे टाळावे. पावसाळ्यात गडाच्या शिखरावर प्रंचड वेगाने वारा वाहत असतो. तसेच गडाच्या पायऱ्या ८० डिग्री आहेत. त्यामुळे पावसात फक्त अनुभवी ट्रेकर्सनी गडावर जावे.
गोरखगडावर शक्यतो हिवाळ्यात जावे. हिवाळ्यात ट्रेक केल्याने तुम्हाला शिखरावरून संपूर्ण निसर्ग नीट दिसेल. गोरखगडावर हिवाळ्यात ट्रेक करणे पावसात ट्रेक करण्यापेक्षा कमी धोक्याचे आहे. त्यामुळे नवीन ट्रेकर्सनी हिवाळ्यात या गडावर भेट द्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.