

त्वचेवर दिसणारे बदल केवळ सौंदर्याशी संबंधित नसतात तर ते शरीरात सुरू असलेल्या काही गंभीर आजारांचेही संकेत असू शकतात. खासकरून हृदयाशी संबंधित समस्या अनेकदा त्वचेच्या माध्यमातून आधीच इशारा देतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्वचेवर दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
डर्मालाइफ स्किन अँड हेअर क्लिनिकचे फाउंडर-डायरेक्टर डॉ. गौरव गर्ग यांनी जागरणच्या वेबसाईटला माहिती देताना सांगितलं की, त्वचेवरील काही बदल पाहून शरीरातील हार्ट अटॅकच्या सुरुवातीची चिन्हं ओळखता येऊ शकतात. अनेक वेळा रॅशेस, त्वचेचा रंग बदलणं किंवा त्वचेमध्ये झालेला फरक हा शरीराच्या आत सुरू असलेल्या समस्यांचा संकेत असतो.
डोळ्यांच्या आसपास पिवळसर डाग किंवा छोटे उभार दिसू लागले तर ते शरीरातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. त्वचेखाली चरबी जमा झाल्यामुळे तयार होणाऱ्या या गाठींना जॅन्थोमा म्हटलं जातं. विशेषतः पापण्यांच्या कडांवर असे डाग दिसल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं मानलं जातं.
त्वचा, ओठ किंवा बोटांच्या टोकांवर निळसरपणा दिसू लागणं हेही धोक्याचं चिन्ह ठरू शकतं. शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नसल्यास असा बदल दिसून येतो. यामागे हृदयाची कार्यक्षमता कमी होणं हे एक कारण असू शकतं
पाय आणि घोट्यांमध्ये वारंवार सूज येणं हेही शरीरातील रक्तप्रवाह मंदावल्याचं लक्षण मानलं जातं. शरीरात अतिरिक्त द्रव साचल्यामुळे अशी सूज निर्माण होते. हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये हा त्रास अनेकदा आढळून येतो.
नखांच्या आकारात बदल होणं किंवा नखं खाली वाकल्यासारखी दिसणं, हे शरीरात दीर्घकाळ ऑक्सिजनची कमतरता असल्याचं दर्शवतं. तसंच बोटांच्या टोकांना सूज येणं आणि नखांचा आकार बदलणं सुरुवातीची चिन्हं असू शकतात.
चेहऱ्यावर सतत लालसरपणा किंवा गरम जाणवणं याकडेही दुर्लक्ष करू नये. इतर काही लक्षणांसोबत हा त्रास जाणवत असेल, तर त्यामागे गंभीर आरोग्य समस्या दडलेली असण्याची शक्यता असते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.