

घर बांधताना किंवा घराचं लूक डिझाईन करताना टाइल्सची निवड करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. अनेक जण टाइल्स खरेदी करताना त्यांचा रंग, डिझाइन आणि किंमत पाहून निर्णय घेतात. पण केवळ दिसायला सुंदर आहेत म्हणून कोणत्याही ठिकाणी त्याच टाइल्स लावणं योग्य ठरत नाही. कारण घरातील प्रत्येक जागेची गरज वेगळी असते.
चुकीच्या ठिकाणी चुकीच्या टाइल्स लावल्यास काही दिवसांनी ओलावा, गळती, घसरून पडणं, डाग पडणे किंवा टाइल्स तुटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय त्यांची स्वच्छता करतानाही अडचणी येऊ शकतात. टाइल्समुळे घराचं सौंदर्य वाढतंच, पण भिंती आणि जमिनीचं संरक्षणही होतं. त्यामुळे घरातील कोणत्या भागासाठी कोणत्या प्रकारच्या टाइल्स योग्य आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे.
टाइल्स खरेदी करताना अनेक जण सर्वात आधी त्यांचा रंग आणि डिझाइन पाहतात. पण प्रत्येक सुंदर टाइल प्रत्येक जागेसाठी योग्य असेलच असं नाही. उदाहरणार्थ, बाथरूम किंवा जिन्यांमध्ये खूप गुळगुळीत आणि चमकदार टाइल्स लावल्यास पाय घसरण्याची शक्यता वाढते. किचनमध्ये खूप खरखरीत पृष्ठभाग असलेल्या टाइल्स लावल्यास त्यावरील तेलकट डाग आणि घाण साफ करणं कठीण होऊ शकते.
घरातील इतर खोल्यांच्या तुलनेत लिव्हिंग रूममध्ये जास्त लोकांची ये-जा होते. त्यामुळे या भागात मजबूत आणि रोजच्या वापरात लवकर खराब न होणाऱ्या टाइल्स लावाव्यात. मोठ्या आकाराच्या सिरेमिक टाइल्स हा यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मोठ्या टाइल्स लावल्यामुळे दोन टाइल्समधील जोड कमी दिसतात.
लिव्हिंग रूमसाठी मॅट फिनिश किंवा कमी चमक असलेल्या टाइल्स निवडता येतात. अशा टाइल्समुळे प्रकाशाचा जास्त झगमगाट होत नाही. त्यामुळे खोलीला साधा, सुंदर लूक मिळतो. हलका बेज, ग्रे आणि इतर सौम्य रंग लिव्हिंग रूमसाठी चांगले ठरतात. हे रंग घरातील सोफा, पडदे आणि इतर सजावटीच्या वस्तूंसोबतही सहज जुळतात.
किचनमध्ये रोज पाणी, तेलाचे थेंब, उष्णता आणि वेगवेगळे डाग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ डिझाइन आवडलं म्हणून टाइल्स खरेदी करू नयेत. किचनसाठी अशा टाइल्स निवडाव्यात, ज्या सहज स्वच्छ करता येतील.
किचनमधील गॅसच्या मागील बाजूच्या भिंतीला म्हणजेच बॅकस्प्लॅशसाठी ग्लॉसी टाइल्स लावता येतात. या टाइल्सची स्वच्छता करणं सोपं असतं. शिवाय त्या किचनला आकर्षक लूक देतात. इटालियन मार्बलसारखा दिसणारा फिनिश असलेल्या टाइल्सही यासाठी वापरता येतात.
बाथरूमसाठी टाइल्स निवडताना सर्वात आधी सुरक्षिततेचा विचार करायला हवा. बाथरूममध्ये पाणी साचत असल्याने जमिनीचा भाग अनेकदा ओला असतो. अशा वेळी खूप गुळगुळीत आणि चमकदार टाइल्स लावल्यास पाय घसरून पडण्याचा धोका असतो. त्यामुळे बाथरूमच्या जमिनीसाठी पायाला चांगली पकड मिळेल अशा टाइल्स निवडाव्यात.
बेडरूमसाठी टाइल्स निवडताना घरातील इतर भागांपेक्षा थोडा वेगळा विचार करावा. या खोलीत खूप चमकदार किंवा भडक डिझाइनच्या टाइल्स लावण्याऐवजी शांत आणि नैसर्गिक रंगांच्या टाइल्स चांगल्या दिसतात. हलका बेज, सॉफ्ट ग्रे आणि निसर्गाशी मिळतेजुळते रंग बेडरूमला शांत आणि प्रसन्न लुक देतात. स्टोन फिनिश, मॅट फिनिश आणि निसर्गापासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या डिझाइनच्या टाइल्स बेडरूमसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
बाल्कनी, टेरेस, व्हरांडा आणि पार्किंगसारख्या घराबाहेरील जागांसाठी घरात वापरल्या जाणाऱ्या साध्या टाइल्स लावणं टाळावं. कारण या जागांवर थेट ऊन, पाऊस आणि तापमानातील बदलांचा परिणाम होतो. त्यामुळे बाहेरील भागांसाठी मजबूत आणि जास्त टिकणाऱ्या हेवी ड्युटी विट्रिफाइड टाइल्स निवडणं योग्य ठरतं.
संपूर्ण घरासाठी एकाच प्रकारच्या टाइल्स खरेदी करणं नेहमीच योग्य ठरेल असं नाही. कारण प्रत्येक खोली आणि जागेची गरज वेगळी असते. टाइल्स खरेदी करण्यापूर्वी ती जागा घराच्या आत आहे की बाहेर, तिथे ओलावा किती असतो, लोकांची ये-जा किती असते आणि त्या जागेची स्वच्छता किती वेळा करावी लागते, या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.