

अनेकदा जास्त जेवण केल्यानंतर छातीत जळजळ किंवा अस्वस्थपणा जाणवतो. अशावेळी अनेकजण याकडे अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या म्हणून पाहतात. काहीजण गॅस कमी करण्याची औषधं घेतात, तर काही घरगुती उपाय करतात. मात्र प्रत्येक वेळी छातीत होणारी जळजळ ही अॅसिडिटीमुळेच होते असं नाही. काही वेळा हे एखाद्या गंभीर हार्ट अटॅकचं लक्षणही असू शकतं.
हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक आणि अॅसिडिटीची काही लक्षणं सारखीच वाटू शकतात. त्यामुळे अनेकांना नेमकं काय होत आहे हे समजत नाही. परिणामी डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो. हार्ट अटॅकच्या वेळी उपचारांना होणारा हा उशीर धोकादायक ठरू शकतो.
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी डायरेक्टर डॉ. अंशुल कुमार जैन यांच्या मते, छातीत जळजळ झाली की लगेच ती अॅसिडिटी आहे, असं मानणं मोठी चूक ठरू शकते. काही ठराविक लक्षणं वेळीच ओळखली तर गंभीर हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळेत उपचार मिळू शकतात.
छातीच्या भागात हार्टसोबत अन्ननलिका आणि पोटाशी संबंधित अवयवही असतात. या अवयवांकडून मेंदूपर्यंत जाणारे नसांचे संकेत अनेकदा एकसारखे वाटू शकतात. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने होणारी वेदनाही काही वेळा अॅसिडिटीमुळे होणाऱ्या जळजळीसारखी जाणवते.
यामुळे अनेक रुग्ण छातीत होणारा त्रास तासन्तास किंवा काही दिवस गॅस, अॅसिडिटी किंवा अपचन समजून घरच्या घरी उपचार करत राहतात. मात्र हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाच्या स्नायूंना सतत नुकसान होत असतं. अशा परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. वेळेत उपचार न मिळाल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉ. जैन यांच्या मते, खालीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे फक्त अॅसिडिटी म्हणून पाहू नये.
छातीत सुरू झालेला त्रास जबडा, मान, पाठ किंवा हातापर्यंत पसरत असेल, तर हे हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं.
छातीत जळजळ होत असतानाच अचानक श्वास घेण्यास अडचण येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
कुठलाही विशेष शारीरिक त्रास किंवा कारण नसताना अचानक थंड आणि चिकट घाम फुटत असेल, तर हे हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतं.
छातीत त्रास जाणवत असताना अचानक खूप अशक्तपणा येणं, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
हार्ट अटॅकच्या वेळी फक्त वेदना किंवा जळजळच होते असं नाही. छातीत जडपणा, दाब किंवा आवळल्यासारखं वाटणं हे देखील हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.