

चुकीच्या पद्धतीने तेल वापरल्यास हृदयविकाराचा गंभीर धोका वाढतो.
FSSAI नुसार योग्य तेल, योग्य तापमान आणि योग्य प्रमाण तपासणे अत्यावश्यक आहे.
वापरलेलं तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आपल्या घरात रोजच्या स्वयंपाकात तेलाशिवाय काहीच शक्य होत नाही. पण हेच तेल चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. देशातील अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणारी संस्था FSSAI सतत या विषयावर जनजागृती करते. त्यांच्या मते लोक सर्वात जास्त चूक करतात ती म्हणजे कोणते तेल वापरतात, किती वापरतात आणि ते कसे गरम करतात याकडे लक्ष न देणे.
आपण वापरत असलेलं प्रत्येक तेल हे ठराविक तापमानानंतर जळतं, याला 'स्मोक पॉइंट' म्हणतात. तेल खूप तापलं किंवा खूप वेळ गरम केलं तर त्यातील पौष्टीक घटक नष्ट होतात आणि ते विषारी स्वरूपात बदलतं. अशा तेलामुळे हृदयविकार, पचनाचे त्रास आणि कोलेस्टेरॉल वाढण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अनेक लोक सुट्टं तेल वापरतात, पण ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण त्याची गुणवत्ता तपासलेली नसते. म्हणून पॅकबंद तेल वापरणं नेहमी सुरक्षित ठरतं. सूर्यफूल, सोयाबीन, तिळाचे, मोहरीचे किंवा रिफाइंड तेल यातील पोषक मूल्ये जास्त काळ टिकतात. मात्र वनस्पती किंवा मार्जरीनसारख्या तेलांचा वापर टाळावा, कारण त्यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते आणि त्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
तेल किती वापरतो याकडेही लक्ष ठेवणं तेवढेच महत्त्वाचं आहे. अनेकदा नकळत आपण जास्त प्रमाणात तेल खातो आणि त्यातून वजन वाढणे, उच्च रक्तदाब, डायबिटीज आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या निर्माण होतात. पचन संस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होतो. गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास वारंवार होऊ शकतात. त्वचेवर पुरळ, मुरुम किंवा केसगळतीही तेलाच्या अतिवापरामुळे वाढू शकते.
एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरणंही धोकादायक असतं. काही कारणास्तव वापरावेच लागलं तर ते नीट गाळून घ्यावं. त्याचे रंग आणि वास बदलला असल्यास ते तेल लगेच फेकून द्यावं. कारण अशा तेलात हानिकारक घटक तयार होतात, जे शरीराला गंभीर हानी पोहोचवू शकतात.
योग्य तेलाची निवड, योग्य प्रमाण आणि योग्य तापमान या तिन्ही गोष्टी स्वयंपाक करताना पाळल्या तर हृदयविकारापासून ते पचनाच्या तक्रारींपर्यंत अनेक त्रास टाळता येतात. दैनंदिन आहारातील तेलाबाबत थोडी काळजी घेतली, तर हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि रक्ताच्या नसा निरोगी राहतात.
टिप: हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय उपचार, निदान किंवा सल्ल्याचा पर्याय नाही. कोणत्याही आरोग्यासंबंधी समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.