

शरीरासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं. शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी त्याची गरज असते. हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यापासून ते अन्न पचवण्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ तयार करण्यापर्यंत कोलेस्ट्रॉलची भूमिका असते. मात्र शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल (Low-Density Lipoprotein) जास्त प्रमाणात वाढलं तर आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी हाय कोलेस्ट्रॉलमुळे सुमारे 44 लाख मृत्यू होतात. एकूण मृत्यूंपैकी हा आकडा 78 टक्के असल्याचं सांगितलं जातं. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढलं की, ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचून प्लाक तयार करतं. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
इन्स्टाग्रामवर लंडनमधील डॉक्टर सेर्मेड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही लोक करत असलेल्या एका चुकीकडे लक्ष वेधलं आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याचं समजलं की, अनेक जण लगेच डाएटिंग सुरू करतात. खाण्यापिण्यावर अचानक खूप निर्बंध घालतात किंवा कमी वेळात वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करतात. मात्र अशा पद्धतीने अचानक डाएटिंग करणं कोलेस्ट्रॉल कमी करण्याऐवजी शरीरावर उलट परिणाम करू शकतं.
त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात अचानक मोठे बदल करण्यापेक्षा हळूहळू आणि सातत्याने आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं अधिक योग्य ठरू शकतं.
शरीराला पुरेसं अन्न न मिळाल्यास म्हणजेच शरीर उपाशी राहिल्यास लिव्हरकडून अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार होण्याची शक्यता असते. शरीराला ऊर्जा कमी मिळत असताना पेशींच्या आवरणाची रचना म्हणजेच सेल मेंब्रेनची मजबुती आणि हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी शरीर काही बदल करू शकतं.
याशिवाय क्रॅश डाएट किंवा खूप कडक डाएट फार काळ पाळणं अनेकांना शक्य होत नाही. अशा डाएटमुळे शरीराचा बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच शरीर विश्रांतीच्या अवस्थेत ज्या वेगाने ऊर्जा खर्च करतं तो दर कमी होऊ शकतो.
डाएट अचानक सोडल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याचा 'रीबाउंड इफेक्ट' होऊ शकतो. त्यामुळे काही वेळा लिपिड प्रोफाइल म्हणजेच रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची स्थिती आधीपेक्षाही खराब होण्याची शक्यता असते.
आहारातून ट्रान्स फॅट शक्य तितकं कमी करणं महत्त्वाचं आहे. तळलेले पदार्थ, बिस्किटं, केक आणि पेस्ट्री यांसारखे पदार्थ शक्यतो टाळावेत. या पदार्थांमध्ये अनेकदा हायड्रोजनेटेड किंवा अंशतः हायड्रोजनेटेड वनस्पती तेलांचा वापर केला जातो.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवण्यासाठी फॅटी फिश म्हणजेच ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असलेल्या माशांचा आहारात समावेश करता येतो. ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले सप्लिमेंट्सही घेतले जातात.
कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी आहारात फायबरचं प्रमाण वाढवणं फायदेशीर ठरू शकतं. दररोज साधारण 30 ग्रॅम फायबर घेण्याचा प्रयत्न करावा.
म्हणूनच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा किंवा अचानक क्रॅश डाएट करण्यापेक्षा ट्रान्स फॅट कमी करणं, योग्य प्रमाणात ओमेगा-3 घेणं आणि फायबरयुक्त पदार्थ आहारात वाढवणं तुमच्या फायद्याचं ठरतं.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.