Firecracker Burn First Aid : दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला? घाबरू नका! पहिली १० मिनिटे महत्त्वाची, लगेच करा 'हे' १ काम

Hand Burn Treatment : दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजल्यास त्वरित योग्य प्रथमोपचार करणे महत्त्वाचे आहे. हात भाजल्यावर घाबरून न जाता, त्वरित घरगुती उपायांची मदत घ्यावी.
Hand Burn Treatment
Firecracker Burn First AidAI PHOTO
Published On: 
Summary

दिवाळीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडतात

फटाक्यांमुळे अनेक वेळा हात भाजतो

हात भाजल्यावर योग्य प्रथमोपचार करणे महत्त्वाचे ठरते

दिवाळीचा सण म्हणजे दिवे, आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी. मात्र, फटाके फोडताना थोडीशी चूक झाली तरी हात, बोटे किंवा चेहरा भाजण्याचा धोका असतो. फटाक्यांमुळे होणारी भाजण्याची दुखापत म्हणजेच 'बर्न इंजरी' ही गंभीर ठरू शकते. अशा वेळी घाबरून न जाता योग्य प्रथमोपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत घेतलेली काळजी त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकते.

फटाक्यांमुळे हात भाजल्यास पहिल्या १० ते २० मिनिटांत काय करावे?

भाजलेला भाग त्वरित थंड पाण्याखाली ठेवा

फटाक्यांमुळे हात भाजल्यास सर्वप्रथम भाजलेला भाग थंड वाहते पाण्याखाली धरा. भाजलेला भाग किमान १०-२० मिनिटे थंड वाहत्या पाण्याखाली ठेवा. बर्फ किंवा अतिशय थंड पाणी वापरू नका.

हातातील ज्वेलरी काढा

भाजलेल्या भागावर सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे हातातील अंगठी, बांगडी, घड्याळ किंवा इतर घट्ट वस्तू शक्य तितक्या लवकर काढून टाका. मात्र, एखादी वस्तू त्वचेला चिकटली असेल तर ती जबरदस्तीने काढू नका.

भाजलेल्या त्वचेवर टूथपेस्ट किंवा तेल लावू नका

हात भाजल्यानंतर अनेकजण घरगुती उपाय म्हणून टूथपेस्ट, तूप, खोबरेल तेल, हळद किंवा बर्फ लावतात. मात्र, हे उपाय टाळावेत. अशा पदार्थांमुळे उष्णता त्वचेमध्ये अडकू शकते, जखम दूषित होऊ शकते किंवा डॉक्टरांना जखमेची तपासणी करणे कठीण होऊ शकते.

Hand Burn Treatment
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

भाजलेल्या भागावर स्वच्छ पट्टी लावा

थंड पाण्याने भाजलेला भाग थंड केल्यानंतर जखमेवर स्वच्छ, निर्जंतुक आणि त्वचेला न चिकटणारी पट्टी हलक्या हाताने लावा. मात्र जखमेवर घट्ट पट्टी बांधू नका, कापूस थेट जखमेवर ठेवू नका, त्वचेवर आलेले फोड फोडू नका आणि भाजलेल्या त्वचेची साल ओढू नका या गोष्टींची खबरदारी घ्या.

गंभीर भाजल्यास त्वरित रुग्णालयात जा

फटाक्यांमुळे हात भाजला असल्यास जखमेची तीव्रता तपासणे आवश्यक आहे. त्वचा पांढरी, काळी किंवा खोलवर भाजलेली दिसत असेल, तसेच हाताची बोटे हलवताना त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा. तीव्र वेदना, सुन्नपणा जाणवणे. चेहरा, डोळे किंवा मोठ्या भागावर भाजले असेल तर घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरांचा योग्य उपचार गरजेचा असतो.

दिवाळीत बर्न इंजरी टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी

  • फटाके मोकळ्या जागेत आणि सुरक्षित अंतरावर फोडा.

  • फटाके फोडताना पाण्याची बादली जवळ ठेवा.

  • लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीशिवाय फटाके फोडू देऊ नका.

  • फटाके पेटवताना सुती कपडे वापरा.

  • न फुटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका.

  • फटाके हातात धरून पेटवू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.