

भारतात मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय
निम्म्या रुग्णांना आजाराची कल्पना नसते
वेळेवर निदान न झाल्यास गंभीर गुंतागुंत होते
भारतात मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि देशातील लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे जवळपास निम्म्या म्हणजेच ५० टक्के रुग्णांना आपल्याला मधुमेह आहे हेच माहिती नसतं. हृदयविकार, किडनी नुकसान किंवा दृष्टी कमी होणं यांसारख्या गंभीर समस्या झाल्यानंतरच त्यांना मधुमेहाचं निदान होतं.
तज्ज्ञ सांगतात की, वेळेवर तपासणी, नियमित निदान आणि संतुलित जीवनशैली पाळली तर या दीर्घकालीन गुंतागुंती टाळता येतात आणि जीवनाची गुणवत्ता सुधारता येऊ शकते.
मधुमेह हा एक चयापचय विकार आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नसेल तर टाईप १ मधुमेह होतो, आणि शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नसेल तर टाईप २ मधुमेह होतो.
जर यावर नियंत्रण ठेवलं नाही तर मधुमेहामुळे हृदयविकार, मज्जातंतूंचं नुकसान, किडनी निकामी होणं, अंधत्व आणि अगदी अवयव कापावा लागणं यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. राशी अग्रवाल सांगतात की, सुरुवातीला मधुमेहाची लक्षणं जाणवत नाहीत, म्हणूनच निम्म्या लोकांना आपल्याला मधुमेह आहे हेच माहिती नसतं. ३० ते ६५ वयोगटातील अनेक रुग्ण आमच्याकडे हृदय किंवा किडनीच्या समस्येनंतर येतात आणि त्यावेळी त्यांना मधुमेहाचं निदान होतं. जागरूकतेचा अभाव, अनियमित तपासणी आणि ‘मधुमेह फक्त वयस्क लोकांचा आजार आहे’ हा गैरसमज यामुळे निदान उशिरा होतं.
डॉ. राशी पुढे सांगतात की, सतत तहान लागणं, वारंवार लघवी होणं, वजन कमी होणं, थकवा जाणवणं, दृष्टी कमजोर होणं आणि जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागणं ही लक्षणं दिसली तर लगेच रक्तातील साखरेची तपासणी करावी. साध्या रक्तातील साखरेच्या चाचण्यांमुळे आजार वेळीच ओळखता येतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.
मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्सच्या रिजनल टेक्निकल हेड डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितलं की, मधुमेहाचं निदान करण्यासाठी नियमित तपासणी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. फास्टिंग ब्लड शुगर (FBS), पोस्टप्रांडियल ब्लड शुगर (PPBS) आणि HbA1c या चाचण्या मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्यांनी नियमित तपासणी करावी.
डॉ. उपासना पुढे सांगतात की, निरोगी आहार घेणं, दररोज व्यायाम करणं, तणावावर नियंत्रण ठेवणं, धूम्रपान टाळणं आणि पुरेशी झोप घेणं हीच मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे. नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्यास गंभीर आजारांपासून दूर राहता येऊ शकतं.
मधुमेह म्हणजे नेमका कोणता आजार असतो?
इन्सुलिन कमी किंवा शरीर प्रतिसाद न दिल्यास होतो.
मधुमेहाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत?
टाईप १ आणि टाईप २ हे प्रमुख प्रकार आहेत.
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात?
तहान, लघवीमध्ये बदल, थकवा आणि वजन घटणं.
मधुमेहाचं निदान कसं करता येतं?
FBS, PPBS आणि HbA1c चाचण्यांनी निदान होतं.
मधुमेह नियंत्रणासाठी कोणते उपाय उपयुक्त आहेत?
संतुलित आहार, व्यायाम, झोप आणि तणाव नियंत्रण.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.