

भारतातील बहुतांश लोकांना त्यांच्या कोलेस्ट्रॉलची माहिती असते. मात्र आपलं वैयक्तिक LDL-C लक्ष्य किती असावं, याची माहिती फार कमी लोकांना असते. हृदयाच्या आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी एकच उपचार किंवा काळजी घेण्याची पद्धत योग्य ठरत नाही. व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती आणि इतर जोखीम लक्षात घेऊन LDL-C चं लक्ष्य ठरवलं जात, असं कार्डिओलॉजिस्ट सांगतात.
३४ वर्षीय व्यक्तीला वार्षिक आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मिळाला. त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेत असल्याने सर्व काही ठीक आहे, असं त्यांना वाटलं. मात्र डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. लॅब रिपोर्टमधील सामान्य श्रेणी सर्वसाधारण माहिती देते. मात्र कौटुंबिक इतिहास, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या वैयक्तिक जोखीम घटकांनुसार एखाद्या व्यक्तीचं LDL-C लक्ष्य वेगळं असू शकतं.
भारतातील शहरी भागांमध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७.८ टक्के मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होतात. तसंच, देशातील ३१ टक्के व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली दिसून येते. पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींच्या तुलनेत भारतातील व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजार १० ते १५ वर्षे आधी होतो.
अनेकांना त्यांच्या एकूण कोलेस्ट्रॉलची आकडेवारी माहिती असते. मात्र स्वतःचं वैयक्तिक LDL-C लक्ष्य किती असावं, याची माहिती फार कमी लोकांना असते.
उच्च LDL-C ला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण त्याची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. मात्र, कालांतराने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा होऊ शकतात. या प्रक्रियेला अथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात.
रक्तवाहिन्यांमध्ये हे थर जमा झाल्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका वाढू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, व्यक्ती तरुण आहे, नियमित व्यायाम करते किंवा तिचं वजन नियंत्रणात आहे, याचा अर्थ तिची LDL-C पातळी योग्य मर्यादेत आहेच असे नाही.
LDL-C ची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान वयापासून तपासणी करणं महत्त्वाचं आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (CSI) कडून वयाच्या १८व्या वर्षापासून लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. वेळेवर तपासणी केल्यामुळे आरोग्याची समस्या गंभीर होण्यापूर्वी तिचा शोध घेता येतो. बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीमध्येही LDL-C ची पातळी जास्त असू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
मुंबईतील सैफी हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शाह म्हणाले, “लवकर निदान म्हणजे केवळ आकडेवारी तपासणं नाही. LDL-C चे लक्ष्य प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असतं. त्यामुळे सर्वांसाठी एकच पद्धत योग्य ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीचं वय, कौटुंबिक इतिहास तसंच मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे इतर आजार यांसारखे वेगवेगळे जोखीम घटक असतात. त्यानुसार LDL-C ची योग्य पातळी ठरवली जाते. LDL-C ची पातळी योग्य मर्यादेत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करणं, आपल्या आरोग्याच्या स्थितीची माहिती ठेवणं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणाच्या प्रक्रियेत स्वतःही काळजी घेणं गरजेचं आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.