

रात्री झोपेत असताना अचानक छातीत तीव्र वेदना होऊन तुम्हाला जाग येते का? जर खरचं तुम्हाला हा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकजण अशा वेदनांना गॅस, अॅसिडिटी किंवा थकवा समजून टाळतात. मात्र तज्ज्ञांच्या मते ही लक्षणं कधी कधी गंभीर आजाराची किंवा अगदी हार्ट अटॅकची असू शकतात.
छातीत होणारी वेदना दिवसाची असो किंवा रात्रीची ती वारंवार होत असेल किंवा खूप तीव्र असेल तर तिची तपासणी करणं गरजेचं असतं. विशेषतः वेदनांमुळे जाग येणं हे शरीराकडून मिळणारे इशारे मानले जातात.
रात्री छातीत वेदना होण्यामागची कारणं कोणती असू शकतात, याबाबत ‘न्यू फोर्टिस’ रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रमोद कुमार यांनी माहिती दिलीये. त्यांच्या मते, काही वेळा ही कारणं साधी असू शकतात. पण काही वेळा ती जीवघेणी ठरू शकतात.
एंजायना ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि छातीत दडपण जाणवतं. या प्रकारच्या वेदना विश्रांती घेताना किंवा झोपेतही होऊ शकतात आणि यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
अॅसिड रिफ्लक्सही एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. झोपताना किंवा आडवं झाल्यावर पोटातील आम्ल वर येतं. ज्यामुळे छातीत जळजळ किंवा दडपण जाणवतं. ही समस्या दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांमुळेही छातीत वेदना होऊ शकतात. अचानक रक्तदाब खूप वाढल्यास छातीत तीव्र वेदना जाणवू शकतात. त्याचप्रमाणे प्ल्यूरिसी (Pleurisy) सारख्या आजारांमध्ये श्वास घेताना छातीत टोचल्यासारखं दुखणं जाणवतं.
तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट लक्षणं दिसल्यास ही स्थिती हार्ट अटॅकप्रमाणे असू शकते. छातीत खूप तीव्र किंवा टोचणारी वेदना, अचानक मळमळ, थंड घाम येणं, आडवं झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं तसंच हृदयाची धडधड अनियमित होणं ही सर्व लक्षणं धोक्याची घंटा ठरू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.