

हाय कोलेस्ट्रॉलला आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. कारण शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीज यांसारख्या समस्यांचा धोका यामुळे वाढू शकतो. परिस्थिती गंभीर झाल्यास जीवावरही बेतू शकतं.
मात्र शरीरातील प्रत्येक प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाईट नसतं. शरीरात 'गुड कोलेस्ट्रॉल' म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉलचीही गरज असते. यामुळे शरीरातील निरोगी पेशी तयार होण्यास मदत होते. पण 'बॅड कोलेस्ट्रॉल' म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास वेळीच सावध होणं गरजेचं आहे.
रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास ते हळूहळू रक्तवाहिन्यांच्या आतील भागात जमा होऊ शकतं. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. अशा वेळी हृदयाला रक्त पुरवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो.
हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं अनेकदा थेट दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना त्याची माहितीच नसते. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली जाते. मात्र शरीराच्या काही भागांमध्ये सतत किंवा तीव्र वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास जांघ, कंबर आणि पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. काही जणांना या भागांमध्ये गोळे येणं किंवा तीव्र आकडी येण्याचाही त्रास होऊ शकतो.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास फक्त हृदयापर्यंतच नाही तर शरीराच्या इतर भागांपर्यंतही रक्त पोहोचण्यात अडचण येऊ शकते. विशेषतः पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास त्या भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जांघ, कंबर आणि पोटऱ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. ही समस्या पेरिफेरल आर्टरी डिजीज म्हणजेच पायांच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचा संकेत असू शकते.
जांघ, कंबर किंवा पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर चालणं-फिरणं, रोजची सामान्य शारीरिक कामं करणं किंवा जिने चढणंही कठीण होऊ शकतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं महत्त्वाचं आहे. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली जाते. या रक्त तपासणीत शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासता येते.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे पायांमधील रक्तप्रवाहावर परिणाम झाल्यास खालील लक्षणं दिसू शकतात-
पाय आणि तळपायांमध्ये तीव्र वेदना होणं
पाय सुन्न पडणं
पाय थंड पडणं
पायांच्या नखांचा रंग पिवळसर होणं
पायांच्या बोटांना सूज येणं
पायांमध्ये अशक्तपणा जाणवणं
पायांच्या त्वचेचा रंग बदलणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.