Shreya Bugde: झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी शोचं स्वरूप नव्याने सजवण्यात आलं आहे. ‘कॉमेडीचं गँग वॉर’ या नावाने हा नवा सीझन सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे. मात्र या नव्या पर्वात दोन महत्त्वाचे चेहरे, डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसत नसल्याने अनेक प्रेक्षक याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे.
या शोमध्ये सुरुवातीपासून असलेली कलाकार श्रेया बुगडे देखील यंदाच्या गँग वॉर पर्वात आहे. मात्र या दोन जुन्या कलाकारांची तिला देखील आठवण येत आहे. एका मुलाखतीमध्ये श्रेयाने स्पष्टपणे सांगितले की, तिलाही निलेश आणि भाऊची खूप आठवण येतेय आणि हे फक्त तिचं नाही, तर प्रेक्षकसुद्धा याबाबत सतत विचारणा करत आहेत.
श्रेया म्हणाली, “हो, नक्कीच. भाऊ आणि निलेश या सीझनमध्ये नाहीयेत. आम्हालाही त्यांची आठवण येते आणि प्रेक्षकांचं प्रेम इतकं आहे की, तेही सतत विचारतात. हेच आमच्या शोचं यश आहे. या सीझनमध्ये काही गोष्टी नवीन आहेत. नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. त्यांचं टॅलेंट पाहून खरंच खूप छान वाटतं. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे.”
शोचं सूत्रसंचालन यावेळी अभिजीत खांडकेकर करत आहे. डॉ. निलेश साबळे, जो पूर्वी शोचं सूत्रसंचालन करत होता, तो यावेळी या शोमध्ये नाही. कारण त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो खूप व्यस्त असल्यामुळे त्याला सहभागी होता आलं नाही, अशी माहिती मिळते. त्याचप्रमाणे, विनोदी अभिनेता भाऊ कदमही काही वैयक्तिक कारणांमुळे या पर्वात दिसणार नाही.